Pune Crime: पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडी; पावणे सात लाखांचा मुद्देमाल लंपास

By नितीश गोवंडे | Published: March 14, 2024 04:03 PM2024-03-14T16:03:16+5:302024-03-14T16:04:57+5:30

शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी ६ काख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे...

Burglary at four places in Pune city; Seven lakhs worth of goods were stolen | Pune Crime: पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडी; पावणे सात लाखांचा मुद्देमाल लंपास

Pune Crime: पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडी; पावणे सात लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असून १ जानेवारी पासून २९ फेब्रुवारीपर्यंत शहरात ८० पेक्षा अधिक घरफोड्यांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १३) शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी ६ काख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

पहिल्या घटनेत कॅम्प भागातील राजस्थान भवन जवळील एका दुकानाच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी भरत शंकर सुतार (५३, रा. शिवनेरी नगर कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ते १३ मार्च दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी भरत सुतार यांचे कॅम्प मधील कोळसा गल्ली येथे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
दुसऱ्या घटनेत कात्रज येथील संतोष नगर येथील एका घराचे भर दुपारी कुलूप तोडून सोन्या, चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम असा २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमजानबी दाऊद शेख (४५, रा. संतोष नगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी रमजानबी शेख यांचे घराच्या कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भिंगारे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत बेनकर वस्ती, धायरी येथे भरदुपारी एका दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी ललित दत्तात्रय सपकाळ (३५, रा. बेनकरवस्ती, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ मार्च रोजी दुपारी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी ललित पाटील हे घराला कुलूप लावून खासगी कामाला गेले होते. चोरट्यांनी याचा फायदा घेत कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधील लोखंडी लॉकर मधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड तपास करत आहेत. तर चौथ्या घटनेत वडगाव शेरी एका घरातील लॉकर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १ लाख ४८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी महादेवी शंकर राठोड (३६, रा. भाजी मंडई, वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महादेवी राठोड यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून हॉल मधील कपाटाच्या लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १ लाख ४८ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: Burglary at four places in Pune city; Seven lakhs worth of goods were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.