प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 06:12 AM2017-09-10T06:12:45+5:302017-09-10T06:12:58+5:30

पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे.

The burden of the passengers continues; Senior citizen, 50 thousand students got recruited | प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

प्रवाशांवरचा दरवाढीचा बोजा कायम; ज्येष्ठ नागरिक, ५० हजार विद्यार्थी वेठीला

googlenewsNext

पुणे : पीएमपीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासदरात वाढ केली त्याबाबत सुरुवातीला ओरड झाली; मात्र आता ती थांबली असून पीएमपीने दरवाढ सुरूच ठेवली आहे. १० ते ११ हजार ज्येष्ठ नागरिक व सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना यामुळे दरमहा जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर अंतरानुसार रक्कम होते, त्यात सवलत देणारा पास तर रद्दच करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गरज नसतानाही आॅल रूट्सचा ७५० रुपयांचा पास घ्यावा लागतो. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरीच घेतली नसल्याची टीका यावर होत आहे.
पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जातो. आॅगस्ट २०१७मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केली गेली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासचा दर ४५० रुपयांहून एकदम ७०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ ५६ टक्के आहे. विद्यार्थ्यांच्या पासचा दर ६०० रुपये होता. तो आता ७५० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ २५ टक्के आहे. सामान्य प्रवासी पासचा दर १ हजार २०० रुपये होता, तो १ हजार ४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ १७ टक्के आहे.
यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत शहराचा मध्यभाग सोडून उपनगरांमध्ये राहायला गेलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ४५० रुपयांऐवजी त्यांना एकदम ७०० रुपये म्हणजे २५० रुपये जास्तीचे दरमहा मोजावे लागत आहेत. त्यातही अंतराचा पास तर बंदच केल्यामुळे प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही या विद्यार्थ्यांना पाससाठी ७०० रुपयेच द्यावे लागत आहेत.
वास्तविक, सवलतीपोटी पीएमपी काहीही तोटा होत नाही, कारण जेवढ्या रकमेची सवलत दिली जाते, तेवढी रक्कम महापालिका त्यांना अदा करते. १ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत अथवा महाविद्यालयात जाण्यासाठी सवलतीच्या पासचा लाभ घेतात. त्यांना वाढीव दर द्यावा लागत असल्यामुळे पालकही त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पीएमपीच्या या दरवाढीचा त्रास होत आहे. महापालिका अनुदान देत असूनही पीएमपीने दर वाढविण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरण कोणीही देत नाही. महापालिकेकडून अदा होणारे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे पाससाठी जे पैसे रोख मिळतात त्यात वाढ व्हावी, या हेतूने ही वाढ करण्यात आली असल्याचे समजले.
ही दरवाढ झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, प्रवासी संघटना यांच्याकडून बरीच टीका झाली. त्याची महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तसेच विरोधी पक्षांनीही दखल घेतली व पीएमपीच्या अधिकाºयांना बैठकीस बोलावले. मात्र, त्यांनी दुय्यम अधिकारी पाठवल्यामुळे ती बैठकच झाली नाही. नंतर मात्र महापालिका पदाधिकाºयांनीच पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व दरवाढीबाबत चर्चा केली. त्यात याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता त्याला महिना होऊन गेला तरीही काही झालेले नाही.
पदाधिकारीही हे विसरून गेले आहेत व पीएमपीही. त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून दरमहा जास्तीचीच रक्कम घेतली जात आहे.

प्रवासी मंचाचा लढा कायम
महापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीविरोधात आवाज उठवणे बंद केले असले, तरी प्रवासी मंचाने मात्र आपला विरोध सक्रिय ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र पाठविले असून या बेकायदा दरवाढीची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही या दरवाढीची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. अनुदान मिळत असतानाही दरवाढ करण्याचे काही कारणच नाही, असे मंचाचे म्हणणे आहे.

सप्टेंबरमध्ये पासचे नूतनीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जास्तीची रक्कम मागितली जात आहे. अंतराचे पास बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतीचा पास काढायचा असेल, तर ७५० रुपयेच द्यावे लागतील, असे सांगण्यात येते. जुन्या दराने पास द्यायला नकार देण्यात येतो. पालकांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.

Web Title: The burden of the passengers continues; Senior citizen, 50 thousand students got recruited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.