दिव्यांग जयंत मंकलेचे 'डाेळस यश'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 05:44 PM2018-04-28T17:44:19+5:302018-04-28T17:44:19+5:30

जयंत मंकले या दिव्यांग तरुणाने युपीएससी परिक्षेत यश मिळवले अाहे. 75 टक्के अंधत्व असताना जिद्दीने अभ्यास करत त्याने हे यश संपादन केले अाहे.

blind student jayant mankale succeed in upsc exam | दिव्यांग जयंत मंकलेचे 'डाेळस यश'

दिव्यांग जयंत मंकलेचे 'डाेळस यश'

googlenewsNext
ठळक मुद्दे75 टक्के अंधत्व असताना जयंतने मिळविले यश12 तास केला अभ्यास

पुणे : जिद्द, चिकाटी अाणि कष्टाची तयारी असेल तर जगातील कुठलिही गाेष्ट अशक्य नाही. काेलंबसचं गर्व गीतावरुन प्रेरणा घेत पुण्यातील जयंत मंकले या 25 वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्याने युपीएससी परिक्षेत यश संपादन केले अाहे. जयंत मंकले हा 75 टक्के अंध असून त्याचा नुकताच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात 923 वा रॅंक अाहे. जयंतचे हे यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अाहे. 
    जयंतच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरिंग सुद्धा केले अाहे. परंतु 2014 साली त्याला रेटिना पेगमिंटाे हा डाेळ्याचा अाजार झाल्याने त्याला 75 टक्के अंधत्व अाले. परंतु जयंत खचला नाही. या अचानक अालेल्या दिव्यांगामुळे ताे काम करत असलेल्या कंपनीतील नाेकरी त्याला साेडावी लागली. त्यानंतर त्याने युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. वडीलांचे 2003 सालीच निधन झाले हाेते अाणि अाई गृहिणी त्यामुळे पैशाची तशी चणचणच हाेती. वडीलांची केवळ सात हजार रुपये पेंशन मिळत हाेती. अाई काही घरगुती पदार्थ बनवून विकू लागली. जयंतच्या दाेन बहिणीही त्याच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्याच्या युपीएससी करण्याच्या निर्णयाला या तिनही रणरागिणींनी पाठिंबा दिला. त्याला कुठल्याही गाेष्टीची कमी पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. 
   जयंतने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला परंतु ही परीक्षा पास हाेणे साेपे नव्हते. मुळातच ही परिक्षा अत्यंत कठीण अाणि त्यातही 75 टक्के अंधत्व असल्यामुळे जयंतचा प्रवास अत्यंत खडतर हाेता. जयंतने जास्तीत जास्त एेकण्यावर भर दिला. रेडिअाे असाे, किंवा टिव्ही जास्तीत जास्त अभ्यास या माध्यमातून त्याने केला. कमीत कमी नाेट्समध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा असा निश्चय त्याने केला हाेता. काही महत्त्वाच्या अभ्यासाचे माेबाईलमध्ये फाेटाे ताे काेणाकडून तरी काढून घेत असे व त्यानंतर ते झूम करुन ताे ते वाचत असे. यात त्याचा बराचसा वेळ जात असे. दिवसातील 11 ते 12 तास त्याने अभ्यास केला. पैशांची अडचण असल्याने एखादा क्लास लावणे शक्य नव्हते त्यामुळे त्याने घरीच अभ्यास केला. त्याला मनाेहर भाेळे अाणि प्रवीण चव्हाण यांनी माेलाचे मार्गदर्शन केले. त्याच्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे ताे हे यश संपादन करु शकला अाहे. 
    जयंत म्हणाला, यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. मला 75 टक्के अंधत्व असल्याने मला अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. परंतु खचून न जाता जिद्दीने मी अभ्यास केला. काेलंबसाची गर्व कविता माझ्यासाठी प्रेरणास्त्राेत अाहे. अायुष्यात कितीही अडचणी अाल्या तरी खचून न जाता जिद्दीने त्यांचा सामाना करायला हवा. मग यश तुमचेच अाहे. 

Web Title: blind student jayant mankale succeed in upsc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.