नवनिर्माणाच्या आडून भाजपाचा छुपा प्रचार : पंतप्रधानांचेच आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:58 PM2018-09-20T16:58:16+5:302018-09-20T17:03:00+5:30

नवभारतनिर्माण संकल्प सिद्धी अभियान या संस्थेच्या माध्यमातून गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.

BJP's hidden publicity through innovation : PM's appeal | नवनिर्माणाच्या आडून भाजपाचा छुपा प्रचार : पंतप्रधानांचेच आवाहन

नवनिर्माणाच्या आडून भाजपाचा छुपा प्रचार : पंतप्रधानांचेच आवाहन

Next
ठळक मुद्देशाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये लक्ष्यद्र सरकारमधूनच पक्षाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना अशी संस्था सुरू करण्याचा आदेश

राजू इनामदार 

पुणे: नवभारतनिर्माण संकल्प सिद्धी अभियान या संस्थेच्या माध्यमातून गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. ही संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरूनच स्थापन करण्यात आली आहे. थेट राजकीय प्रचार करता येत नाही अशा संस्था, सरकारी कार्यालये यांना लक्ष्य करण्याचा व तिथे पक्षाचा विचार पोहचवण्याच्या सुचना वरिष्ठ स्तरावरून पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  
पुण्यात या संस्थेचे समन्वयक भाजपाचे शहराध्यक्ष असलेले योगेश गोगावले हेच आहेत. संस्था शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. भाजपाच्या नगरसेवकांना त्यात प्रामुख्याने सामावून घेतले जात आहे. सरकारी कार्यांलयांमध्ये जाण्यास राजकीय पक्षांना मर्यादा येतात. तसेच तो टीका विषय होण्याची शक्यता असते. ती अडचण या संस्थेच्या माध्यमातून दूर करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांसाठी सरकारी कार्यालयांचे साह्य घेण्यात येत आहे. तिथे व ज्याठिकाणी राजकीय अभिनिवेश घेऊन जाणे अडचणीचे आहे तिथे जावे व सरकारी योजनांचा प्रसार करावा, त्या राबवाव्यात व थेट लाभार्थींपर्यंत पोहचवाव्यात असे पक्षातील वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आले असल्याची माहिती पक्षाच्याच काही पदाधिकाऱ्यांकडून नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. 
बांबू विकास महामंडळ, महिला विकास महामंडळ या सरकारी कार्यालयाच्या योजना आता भारत नवनिर्माण संकल्प सिद्धी अभियानातून पुढे येत आहेत. अशा कार्यक्रमांच्या नियोजनाची बैठक पक्ष कार्यालयात होते. तुमच्याच खात्याच्या योजनेचे काम आहे, त्याला तुम्ही उपस्थित राहणे आवश्यक आहे असे संबधित खात्यांच्या प्रमुखांना सांगण्यात येत असते. महापालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. तेथील काही अधिकाऱ्यांनाही पक्ष कार्यालयात उपस्थित राहून सरकारी योजनेसाठी महापालिकेचे साह्य आवश्यक आहे असे सांगून त्यांची मदत घेण्यात येत आहे.
 केंद्र सरकारमधूनच पक्षाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना अशी संस्था सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. संस्थेचे पदाधिकारी म्हणून पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी काम करतील व पक्षाचे नाव तळापर्यंत पोहचेल याची काळजी घेतील अशी सुचना देण्यात आली आहे. सत्ता असूनही तिचा जनमाणसावर विशेष प्रभाव पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नवमतदार व सरकारी कर्मचारी, अधिकारी हा वर्ग आकर्षित करून घेण्यासाठी म्हणून हा फंडा काढण्यात आला आहे अशी भाजपाच्याच काही कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. महिलांसाठीच्या तसेच युवक. पर्यावरण संवर्धन, क्रीडा अशा विषयांसाठीच्या योजना भारत नवनिर्माण संकल्प सिद्धी अभियानाच्या माध्यमातून राबवण्याच्या प्रयत्न करण्यात यावा असे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
पुणे शहरातही या संस्थेचे काम सुरू झाले आहे. शहरातील रिकामे भूखंड तसेच बीडीपी आरक्षित जागेवर बांबूचे बेट तयार करण्यासाठी बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी बांबू विकास महामंडळाचे साह्य घेण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही यात सामावून घेण्यात आले असून बैठकीसाठी त्यांनाही बोलावण्यात आले होते. महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे साह्य घेण्यात आले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शहरातील विविध वसाहतींमधील ५ हजार महिला लक्ष्य ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी महिला नगरसेविकांना संस्थेचे समन्वयक करण्यात आले आहे. सर्व कामे भारत नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून होतील याची काळजी घेण्यात येत आहे. 

Web Title: BJP's hidden publicity through innovation : PM's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.