Atal Bihari Vajpayee : ‘अटलजी’ राजकारणातील अंतिम शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:43 PM2018-08-17T23:43:27+5:302018-08-18T00:13:21+5:30

‘अटलबिहारी वाजपेयी’ हे केवळ दोन शब्दच नाही तर भारतीय राजकारणाचा ते श्वास होते...’अटलजी’ म्हणजे संयम, सभ्यता आणि सुसंस्कृतपणा. हा शब्दच आज कायमचा मूक झाला. आपल्या मधुर वाणी, बुद्धिमता आणि काव्यप्रतिभेतून अटलजींनी अप्रत्यक्षपणे अनेकांना आपलेसे केले होते...

Atal Bihari Vajpayee: 'Atalji' is the last word in politics | Atal Bihari Vajpayee : ‘अटलजी’ राजकारणातील अंतिम शब्द

Atal Bihari Vajpayee : ‘अटलजी’ राजकारणातील अंतिम शब्द

Next

अटलबिहारी वाजपेयी’ हे केवळ दोन शब्दच नाही तर भारतीय राजकारणाचा ते श्वास होते...’अटलजी’ म्हणजे संयम, सभ्यता आणि सुसंस्कृतपणा. हा शब्दच आज कायमचा मूक झाला. आपल्या मधुर वाणी, बुद्धिमता आणि काव्यप्रतिभेतून अटलजींनी अप्रत्यक्षपणे अनेकांना आपलेसे केले होते... त्यामुळे त्यांच्या निधनाने प्रत्येकाचे डोळे पाणावले होते... आणि नजर शून्यवत झाली होती... प्रत्येकाला व्यक्त व्हायचे होते, त्यांच्याप्रति आपली कृतार्थ भावना मांडायची होती, हे सांगण्यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियाचा आधार घेतला. नेटिझन्स आपल्या आठवणीतले ‘अटलजी’ उलगडत होते. कुणी कविता, कुणी प्रसंग, कुणी त्यांची भाषणे, कुणी घटना आणि छायाचित्रे पोस्टद्वारे टाकत होते. ‘अटलजी’ भाजपाचा चेहरा असले तरी सत्ताधारी पक्षाच्या खुर्चीवर विराजमान असोत किंवा विरोधी पक्षात बसलेले असोत त्यांनी स्वत:चा संयम कधीही ढळू दिला नाही...माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ‘दुर्गा’ म्हणून केलेला उल्लेख असो किंवा कॉंग्रेसचे देशासाठी योगदान काय? अशा टीकाकारांना दिलेले प्रत्युत्तर असो याच त्यांच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांचे स्थान कायमच उच्च राहिले आहे.
भाषेवरील उत्तम प्रभुत्व आणि लेखणीतून बहरलेल्या अटलजींच्या कवितांचे असंख्य चाहते होते. ’टूटे हुए सपनोंकी सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकोंपर ठिठकी’, ‘मैं जी भर जीया, मैं मन से क्यू मरू, मै वापीस आऊंगा, कूच के लिए मैं क्यू डरू किंवा मौत की उम्र क्या दो पलकी नहीं, जिंदगी-सिलसिला आज कल की नहीं, अशा अनेक कवितांनी नेटिझन्स ‘अटलजी’ंना आदरयुक्त श्रद्धांजली अर्पित करत होते. अनेकांनी आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये अटलजी गुंफले होते. पुण्यातच जनसंघाची स्थापना झाल्यामुळे त्या काळात अटलजींचा वावर पुण्यात अधिक असायचा. त्यांना अनुभवलेले पुणेकर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. आज पक्षभेद सोडून सोशल मीडिया एकाच नावाभोवती एकवटला होता ‘अटलजी.’
एरवी कॉंग्रेस आणि भाजपा अशी वर्गवारी झालेल्या लोकांमध्येही याच एका नावाची चर्चा होती... अटलजी एका पक्षाचे नव्हते तर संपूर्ण देशवासीयांसाठी एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते त्यामुळे प्रत्येकाचे मन भावुक झाले होते आणि अश्रू ढाळत होते...’ अटलजींच्या निधनाने राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतता हरपली... अटलजींना विनम्र अभिवादन!

‘अटलजीं’इतकं चुंबकीय व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही

 -  युवराज शहा (सचिव, श्री महावीर जैन विद्यालय )

अटलजी हे अवघ्या देशाचे आदरणीय व्यक्तिमत्त्व. देशातील सर्व विचारधारा आणि पक्षांच्या भिंती ओलांडून त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात पूजनीय स्थान मिळवले होते. तो काळ १९८१ चा, आम्ही पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे सर्व विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी दिल्ली येथे गेलो होतो. तेथील अनेक संस्था, पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा, तसेच राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती, भेटीगाठी यांनी आमचा कार्यक्रम खचाखच भरलेला होता. आमच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन, चंद्रकांत घोरपडे, विभाग उपप्रमुख प्र. ना. परांजपे इत्यादी होते. गोपाळराव व घोरपडे सरांमुळे आम्हाला अनेक मान्यवरांना लीलया भेटी मिळत होत्या. एक दिवस यूथ होस्टेलमध्ये सकाळी घोषणा झाली, आज वाजपेयींकडे सकाळी ११ वाजता निघायचे आहे. आमचा आनंद गगनात मावेना. भारतीय राजकारणातील एका अत्यंत अभ्यासू , व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वाला आम्ही प्रत्यक्ष भेटणार होतो.
वाजपेयींना कोणी काय विचारायचे याची आगाऊ रंगीत तालीम परांजपे सरांनी नेहमीप्रमाणे करून घेतली. पावसाळी दिवस होते, आम्ही १५ मुले आणि १५ मुली वाजपेयीजींच्या बंगल्यावर पोहचलो. त्यांच्या घरी २/३ पॉमेरियन गोंडस कुत्री होती. भुंकतच त्यांनी आमचं स्वागत केलं... आम्ही दिवाणखान्यात कार्पेटवर बसलो होतो. इतक्यात बाहेर जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि समोर सोफ्यावर आपले धोतर हातात धरत वाजपेयींचं तेजस्वी व्यक्तिमत्व स्थानापन्न झालं... आणि गप्पा रंगू लागल्या. कविता, साहित्य, बालपणाच्या आठवणी. अनेक अवांतर विषयांवर चर्चा चालूच होती, पाऊस वाढतच होता आणि अचानक वाजपेयी उठले और बोले, बच्चों, आज मेरी नौकरानी आई नहीं, और बारिश बहुत है, तो मैं आपको चाय भी आॅफर नहीं कर सकता... और थोड़े रूककर बोले आपमेंसे कोई चाय बना सकता है क्या? सगळ्या मुली स्वयंपाक घराकडे धावल्या, वाजपेयीजी त्यांना खुणाकरून चहा, साखर, दूध कोठे कोठे ठेवले हे दाखवत होते, मुलींनी सुंदर चहा बनविला, वाजपेयींच्या घरी पावसामुळे तब्बल तीन तास त्यांच्याबरोबर थांबण्याचं भाग्य आम्हाला लाभले. आज परराष्ट्र सचिव असलेले विजय गोखले यांची पत्नी, पुर्वाश्रमीची वंदना आपटे ही आमची वर्गमैत्रीणसुद्धा त्यावेळी आमच्या बरोबर होती. वाजपेयींइतकं चुंबकीय व्यक्तिमत्त्व आता पुन्हा होणे नाही.

उदारमतवादी चेह-याचे दर्शन

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाºयांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात येत असतो. अटलबिहारी वाजपेयी यांना महापालिकेने सन १९८७ मध्ये असेच मानपत्र त्यांनी वक्तृत्वकलेला दिलेल्या योगदानाबद्दल दिले होते. त्यावेळी केलेल्या भाषणातून वाजपेयी यांनी आपल्या उदारमतवादाचे दर्शन श्रोत्यांना घडवले होते. त्याची आठवण आजही महापालिकेशी संबंधित अनेकांना आहे.
तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला. मतांवर लक्ष ठेवून प्रत्येक कृती होत असल्याने देशातील समस्या वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते म्हणाले ‘‘लोकशाही व्यवस्थेत मतभेद असलेच पाहिजेत, मात्र मनभेद होता कामा नये. राजकारण हे सेवेचे साधन आहे. सत्ता हीसुद्धा सेवेसाठी आहे व विरोधसुद्धा सेवा चांगली व्हावी यासाठीच असला पाहिजे. समान समस्या असतील त्यावेळी सर्वांनी एकत्र येत प्रश्नांचा सामना करायला हवा.’’ राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मात्र राजकारणातील व्यक्तींचा गौरव करण्याऐवजी समाजावर परिणाम करणाºया सांस्कृतिक, साहित्यिक, संगीत, अशा कलाक्षेत्रातील व्यक्तींचा गौरव महापालिकेने करावा अशी सूचनाही त्याच कार्यक्रमात वाजपेयी यांनी केली. उल्हास बा. ढोले पाटील महापौर असताना हे मानपत्र देण्यात आले. प्रा. शंकरराव खरात, प्रा. रामकृष्ण मोरे असे विविध मान्यवर त्यावेळी सभागृहात उपस्थित होते. ते सगळेच वाजपेयींच्या भाषणाने प्रभावीत झाले होते.
 संदर्भ - (लोकोत्तर जीवनव्रती : रामभाऊ म्हाळगी यांचे चरित्र)


बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयात अटलजी आणि रामभाऊ

1954  मध्ये रामभाऊंनी पुणे शहरात नागरी आघाडी, किसान आघाडी महिला आघाडी, मजदूर आघाडी, युवा आघाडी, इत्यादी विविध क्षेत्रात कामास सुरुवात केली. त्यांच्या या कार्याला अधिक सुव्यवस्थित स्वरूप यावे आणि त्याला चालना मिळावी म्हणून पुण्यात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची परिषद भरवण्यात आली. डॉक्टर श्यामाप्रसाद यांचे तत्कालीन खाजगी चिटणीस अटलबिहारी वाजपेयी त्यासाठी मुद्दाम दिल्लीहून आले होते. कर्नाटकचे संघटनमंत्री जगन्नाथराव जोशी हेही उपस्थित होते.


1956 साली अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पुण्यात येणार होते. त्या वेळी बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात विद्यार्थ्यांसाठी त्यांचे व्याख्यान ठेवावे म्हणून रामभाऊंनी विनंती केली. दुसºया पंचवार्षिक योजना याविषयावरील अटलजींच्या व्याख्यानाला श्रोत्यांंनी भरभरुन प्रतिसाद दिला. कमालीच्या रंगलेल्या या व्याख्यानाला विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. व्याख्यान ऐकण्याकरिता बाहेरच्या विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आल्याने संयोजकांना नियोजन कसे करावे याचे धडे रामभाऊंकडून विद्यार्थ्यांनी घेतले. पुढे या भाषणाचे वृत्त वसंत गोखले नावाच्य विद्यार्थ्याने तयार केले. वृत्तपत्रासाठी बातमीचा इंट्रो (पहिला परिच्छेद) स्वत: अटलजींनीच सांगितला. या वृत्ताला पुण्यात व पुण्याबाहेर खूपच प्रसिद्धी मिळाली. यामुळेच अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेजने त्या वर्षीच्या स्नेहसंमेलनात अभिरूप लोकसभा सादर करायचे ठरवले. अटलजींच्या व्याख्यानाचा व भेटीचा प्रभाव इतका की मंत्रिमंडळ जनसंघाचेच असावे असा विद्यार्थ्यांनी त्यावेळी कौलही दिला. विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळ बनवले. पण सभागृहाचे कामकाज पद्धती कोणालाच माहीत नसल्याने सगळाच गोंधळ उडाला. यानंतर सगळेजण रामभाऊंकडे आले. त्यांनी ठराव, उपसूचना याविषयी सर्वांना सांगितले. त्यावेळी उपप्राचार्य डॉक्टर शेजवलकर सभापती होते. ही अभिरूप लोकसभा खूपच रंगली.

Web Title: Atal Bihari Vajpayee: 'Atalji' is the last word in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.