जातीय द्वेष हीच चिंता, राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवार यांची दिलखुलास उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:25 AM2018-02-22T06:25:05+5:302018-02-22T06:25:26+5:30

जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर सामाजिक तेढ निर्माण केली जात असून हे हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतानाच आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाच आरक्षण मिळायला हवे...

Answering the questions of Raj Thackeray, Sharad Pawar's heartfelt concern | जातीय द्वेष हीच चिंता, राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवार यांची दिलखुलास उत्तरे

जातीय द्वेष हीच चिंता, राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवार यांची दिलखुलास उत्तरे

Next

पुणे : जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर सामाजिक तेढ निर्माण केली जात असून हे हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतानाच आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाच आरक्षण मिळायला हवे, अशी स्पष्ट भूमिका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराज हेच मराठी माणसांना एकत्र आणणारे दैवत असून शाहू, फुले, आंबेडकरांच्या या महाराष्टÑात जातीय विष पेरण्याचे उद्योग यशस्वी होणार नाहीत, असेही पवारांनी ठणकावून सांगितले.
जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली. बृहन्ममहाराष्टÑ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे दोन तास रंगलेली ही मुलाखत ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
महाराष्टÑ आणि देशातील राजकारणावर पवार यांना बोलते करताना राज यांनी आपल्या प्रशांचा सगळा रोख मराठी माणूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच ठेवला. यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचे मूल्याधिष्ठित राजकारण सध्या दिसत नाही, या राज यांच्या प्रश्नावर पवार यांनी थेट मोदींवर हल्ला चढविला. ते म्हणाले, ‘‘सध्या राजकारणात वैयक्तिक हल्ले केले जात असताना आपण कुठल्या पदावर आहोत याचेही भान राखण्यात येत नाही. जवाहरलाल नेहरुंनी या देशासाठी काहीच केलं नाही असे म्हणणे चुकीचे आहे. या देशातील लोकशाहीला १२ व्या शतकात सुरुवात झाली असे वक्तव्य संसदेत केले गेले. मग इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत काय लोकशाही नांदत होती का? अटलबिहारींच्या काळात संसदेत सर्वांचा सन्मान राखला जात असे. मात्र आताचे चित्र बदललेले आहे. वैचारिक मतभेद असतील तरी टोकाची भूमिका घेऊ नये हे पथ्य आज देशात पाळले जात नाही.’’ महाराष्ट्रापेक्षा नेहरु मोठे आहेत, या यशवंतराव चव्हाणांच्या वक्तव्याबाबत राज यांनी विचारले असता पवार म्हणाले, जवाहरलाल नेहरुंनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम केले. त्यांच्यादृष्टीने राज्यापेक्षा देश मोठा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्त्वांनी नेहमीच देशाचा विचार सर्वप्रथम केला. महाराष्ट्राला याची काही अंशी किंमत नक्कीच चुकवावी लागली. मात्र सध्याच्या नेतृत्वाने अहमदाबाद ऐवजी देशाचा विचार आधी करायला हवा, असा टोलाही पवारांनी लगावला. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी मुलाखतीमागील भूमिका विषद केली.

विदर्भासाठी लोकमत घ्या
वसंतराव नाईक यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विदर्भातून इतके मुख्यमंत्री झाले तरी वेगळ्या विदर्भाची मागणी कशी होते? या राज यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, वेगळा विदर्भ मागणारा मूलत: मराठी माणूस नाही, अन्य भाषिक आहे. वेगळ्या राज्याचे नेतृत्व आपल्याकडे येऊ शकते, असे मानणारे अन्य भाषिक वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. सामान्य माणूस मनापासून त्याचा पुरस्कर्ता नाही. ज्या कोणाला वेगळा विदर्भ हवा असेल त्यांनी लोकमताच्या माध्यमातून तो घ्यावा.

अजूनही लक्ष दिल्लीकडे!
मुलाखतीच्या शेवटी राज ठाकरे यांनी ‘रॅपिड फायर’ प्रश्न विचारले व त्यांची उत्तरे पवार यांनी एका वाक्यात द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यातील एक प्रश्न ‘मुंबई की दिल्ली’ असा होता व त्यास पवार यांनी ‘दिल्ली’ असे उत्तर दिले. मुंबई आणि महाराष्ट्राचे भले करायचे असेल तर दिल्ली हातात हवीच, असेही ते म्हणाले. यावरून पवार यांच्या मनात दिल्लीचे (म्हणजेच पंतप्रधान व्हायचे) स्वप्न अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधी सविस्तर प्रश्नोत्तरात एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील नेतृत्व एका ठराविक पातळीच्या वर जाऊ नये यासाठी सतत प्रयत्न करणारी एक लॉबी दिल्लीत पूर्वी होती व आजही आहे.

शिंदे यांची विट सरकली
याआधी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले की, मी काँग्रेस सोडली तरी काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधिलकी सोडली नाही. म्हणूनच त्यानंतर माझ्या पक्षाच्या नावात काँग्रेस हा शब्द कायम राहिला. समोर बसलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा उल्लेख करून पवार म्हणाले की, मी सर्वप्रथम वसंतदादांचे सरकार पाडून ‘पुलोद’ सरकार स्थापन करताना काँग्रेस सोडली तेव्हा शिंदेही माझ्याबरोबर होते. काही झाले तरी विठोबाप्रमाणे मी तुमच्यासोबतच विटेवर उभा राहीन, असा शब्द शिंदे यांनी त्यावेळी दिला होता. पण ते पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये गेले व तेथेच राहिले. त्यामुळे त्यांनी विट सोडली नाही. फक्त त्यांच्यासह विट काँग्रेसमध्ये गेली, असे पवार विनोदाने म्हणाले.

बाद नोटा नष्ट करा
पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस रिझर्व्ह बँकेकडून आलेले एक पत्र वाचून दाखविले. त्यात रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेस कळविले होते की, नोटाबंदीनंतर ज्या नोटा तुमच्याकडे जमा झाल्या आहेत त्या बदलून मिळणार नाहीत, हे आधीच कळविले आहे. त्या नोटा नष्ट करा आणि तेवढी रक्कम तुमच्या ताळेबंदात तोटा म्हणून दाखवा. पवार म्हणाले की, सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या बाद नोटा बदलून न मिळणे हा विषय केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर इतरही अनेक राज्यांचा आहे. त्यामुळे सामान्य लोकांचा पैसा बुडाला आहे. आपण याचे उत्तर अनेक वेळा मागितले, पण केंद्र सरकार गप्प आहे, असे पवार म्हणाले. राज ठाकरे यांनी ‘म्हणजे मोदी मनमोहन सिंग यांच्याहून अधिक गप्प बसणारे निघाले’, असा टोमणा मारला. त्यावर पवार म्हणाले की, मनमोहन सिंग सुसंस्कृत असल्याने जास्त बोलत नसत, पण ते असले निर्णयही घेत नसत!


राज की उद्धव?
मुलाखतीच्या शेवटी रॅपिड फायर प्रश्नावर ‘राज की उद्धव?’ अशी गुगली राज ठाकरे यांनी टाकली. मात्र जागतिक क्रिकेटचा अनुभव असलेल्या पवारांनी ‘ठाकरे घराणे’ असे उत्तर देत राज यांचा चेंडू सीमापार टोलविला.

काँग्रेस सोडण्याचे खरे कारण
सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून पवार यांनी काँग्रेस सोडली, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु पवार यांनी त्याचे नेमके कारण प्रथमच सांगितले. ते म्हणाले की, वाजपेयी यांचे सरकार पडले तेव्हा लोकसभेत मी व राज्यसभेत मनमोहन सिंग काँग्रेस पक्षाचे नेते होतो. पर्यायी सरकारचा दावा करताना संसदेतील नेत्याच्या नेतृत्वाखाली करावा, असा लोकशाही संकेत आहे. परंतु सोनिया गांधी यांनी आम्हा दोघांना विश्वासात न घेता परस्पर स्वत:च्या नावाने सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे सादर केला. मला ते अजिबात पटले नाही व मी तात्काळ काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे ठरविले.

मुंबई तोडणे अशक्य
मुंबई, पुण्यातील अर्थकारणावर कब्जा करण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत. त्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम देशाचे नेतृत्त्व करीत आहे. पण कोणी वरून खाली उतरला, तरी मुंबई महाराष्टÑापासून तोडू शकत नाही, असे पवार यांनी ठणकावून सांगितले.

मोदींनी मला गुरु व स्वत:ला शिष्य म्हणणे या केवळ सांगायच्या गोष्टी आहेत. मोदी आधीपासूनच राजकारणात होते, संघाचे-पक्षाचे काम करत होते.

देशपातळीवर भाजपाला
काँग्रेस हाच पर्याय
काँग्रेससारख्या संघटनेचे नेतृत्व करणे, हे आव्हान असले तरी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये ती क्षमता आहे. असे सांगत राष्टÑीयपातळीवर काँग्रेस हाच पक्ष भाजपला पर्याय ठरू शकतो, असे सूचक वक्तव्य पवारांनी केले.

Web Title: Answering the questions of Raj Thackeray, Sharad Pawar's heartfelt concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.