सत्तेतील अमित शाह अन् संघर्षातील शरद पवार...माझ्यासमोर दोन पर्याय होते - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:47 AM2023-12-29T10:47:47+5:302023-12-29T12:47:28+5:30

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अजित पवारांवर थेट टीका करणं टाळत थेट भाजपाविरोधात हल्लाबोल करत आहेत.

Amit Shah in power and On the side of struggle Sharad Pawar I had two options says Supriya Sule | सत्तेतील अमित शाह अन् संघर्षातील शरद पवार...माझ्यासमोर दोन पर्याय होते - सुप्रिया सुळे

सत्तेतील अमित शाह अन् संघर्षातील शरद पवार...माझ्यासमोर दोन पर्याय होते - सुप्रिया सुळे

NCP Supriya Sule ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत आपल्या समर्थक आमदारांसह काही महिन्यांपूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आम्ही महायुतीला पाठिंबा दिला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका आम्ही महायुतीतच लढणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा शरद पवार गट मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत ठामपणे उभा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अजित पवारांवर थेट टीका करणं टाळत थेट भाजपाविरोधात हल्लाबोल करत आहेत. राष्ट्रवादीतील फुटीबद्दल इंदापुरातील एका कार्यक्रमात बोलताना काल खासदार सुळे यांनी भाजप  नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

"सत्ता आणि संघर्ष असे माझ्यासमोर दोन पर्याय होते. सत्तेच्या बाजूला अमित शाह होते आणि संघर्षाच्या बाजूला शरद पवार होते. या दोन्हींपैकी एक पर्याय मला निवडायचा होता. मी संघर्षाचा पर्याय निवडला," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

"जन्मदात्याला विसरता कामा नये"

शरद पवार यांच्याविषयी भावनिक उद्गार काढत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ज्या व्यक्तीने तुम्हाला जन्म दिला त्याला विसरता कामा नये. कोणीतरी सत्य बोलायला हवं. आपण सगळेच घाबरलो तर या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही."

पती आणि मुलांना दिला निरोप

इंदापूर येथील लोकांना संबोधित करताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की, "मी माझ्या पती आणि मुलांना सांगितलंय की आता पुढचे १० महिने मी मुंबईला येणार नाही. ऑक्टोबरपर्यंत मी बारामतीतच राहणार आहे. कारण यंदाची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे पुढचे काही महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत," असं सुळे म्हणाल्या.

Web Title: Amit Shah in power and On the side of struggle Sharad Pawar I had two options says Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.