बनावट ताडीचे केमिकल बनविणारा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची नगरमध्ये कारवाई

By विवेक भुसे | Published: March 27, 2024 11:52 AM2024-03-27T11:52:34+5:302024-03-27T11:53:39+5:30

नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५८ लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त केला...

A fake toddy chemical factory busted; Action taken by Pune Police in the city | बनावट ताडीचे केमिकल बनविणारा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची नगरमध्ये कारवाई

बनावट ताडीचे केमिकल बनविणारा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची नगरमध्ये कारवाई

पुणे : विदेशी बनावटीची दारु बनविणारे कारखाने अनेक ठिकाणी आढळून येतात. परंतु, आता चक्क केमिकलच्या सहाय्याने बनावट ताडी बनविली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केमिकल तयार करणार्‍या नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील कारखान्यावर पुणेपोलिसांनी छापा टाकून तब्बल ५८ लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय ६१, रा. केशवनगर, मुंढवा) आणि निलेश विलास बांगर (वय ४०, रा. पिंपळगाव, खडकी, मंचरजवळ, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक घोरपडी भागात गस्त घालत असताना २३ मार्च रोजी त्यांना माहिती मिळाली. प्रल्हाद भंडारी याच्या केशवनगर येथील घराच्या इमारतीमध्ये बनावट ताडी बनविण्यासाठी लागणारे केमिकलची ५ पोती ठेवली आहेत. पोलिसांनी माहिती घेतल्यावर भंडारी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. तेथे ५ पोत्यात १४२ किलो ७५० ग्रॅम क्लोरल हाईड्रेट रसायन आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलिस उपनिरीक्षक  दिगंबर चव्हाण, सहायक पोलीस फौजदार घुले, पोलीस अंमलदार कांबळे, बास्टेवाड यांनी भंडारी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. हे रसायन कोठून आणले असे विचारल्यावर त्याने निलेश बांगर याने पुरविल्याचे सांगितले.

पोलिसांचे पथक तातडीने आंबेगावातील पिंपळगाव खडकी येथे गेले. तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारी होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील हरीबाबावाडी वेल्हाळे गावात पत्र्याच्या शेडमध्ये हे केमिकल बनविले जात असल्याचे सांगितले. पोलीस पथक तेथे पोहचले. त्या ठिकाणी २ हजार २१७ किलो तयार क्लोरल डायड्रेड तसेच ते तयार करण्यासाठी लागणारे रिअ‍ॅक्टर, मशिनरी, काचेचे उपकरणे व इतर साहित्य असा ५८ लाख ४६ हजार ४४ रुपयांचा माल जप्त करुन हा कारखाना सिल करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे तपास करीत आहेत.

ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगाव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार अजय राणे, बाबासाहेब कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, ओंकार कुंभार, अमेश रसाळ, सागर केकाण, तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, शिवले, कांबळे शेख, दळवी यांनी केली आहे.

Web Title: A fake toddy chemical factory busted; Action taken by Pune Police in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.