साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:17 AM2019-03-10T06:17:39+5:302019-03-10T06:18:22+5:30

शरद पवार म्हणाले, राजाला साथ द्या

Udayan Rajen's nomination from Satara is fixed | साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

googlenewsNext

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे ‘झाले गेले विसरून जावे...पुढे-पुढे चालावे,’ असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आमदार व प्रमुख नेतेमंडळींना दिला. ‘राजाला साथ द्या,’ अशी साद पवारांनी यावेळी सर्व आमदारांना घातली.

राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील आमदारांसह स्वत: खासदार उदयनराजे भोसले हेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना सोडून कुणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार मंडळींची होती. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळत नसेल उदयनराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीच्या सदस्यांनी तर उदयनराजेंना राष्ट्रवादीने तिकीट दिल्यास शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

खासदार पवार जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्य असेल, असे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी या बैठकीतही स्पष्ट केले. त्यानुसार शरद पवार यांनी उदयनराजेंना पुन्हा झुकते माप दिले आहे. सर्व आमदारांनी लोकसभेला मागील सर्व विसरून प्रचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच आमदारांनीही त्यांचा प्रचार करण्याचे मान्य केले.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, आमदार अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील आदींची उपस्थिती होती.

रिंगमास्टर बारामतीकर पवार : पाटील
‘साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत,’ अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे सातारा, हातकणंगले, माढा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद हे सहा लोकसभा मतदारसंघ लढविण्यात येणार आहेत, याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

किरकोळ वाद विवाद हे वाद हे कुठल्या पक्षात नसतात? कार्यकर्त्यांमुळे काही गैरसमज होते. ते आता दूर झाले आहेत. मला शिवेंद्रसिंहराजेंचा कधीच विरोध नव्हता.
- उदयनराजे भोसले,
खासदार

सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचे मत वेगळे होते. आता त्यांची मला नाराजी दूर करावी लागणार आहे. लोकसभेसह विधानसभेलाही आम्ही एकत्र काम करणार आहोत.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

Web Title: Udayan Rajen's nomination from Satara is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.