पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:57 AM2019-03-04T04:57:37+5:302019-03-04T04:57:53+5:30

लोकसभेच्या ४२ जागांचा प्रदेश असलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या घोषणा होण्याआधीच राजकारण तापले आहे.

Congress 'Ekla Chalo Re' in West Bengal? | पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

googlenewsNext

- योगेश पांडे
लोकसभेच्या ४२ जागांचा प्रदेश असलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या घोषणा होण्याआधीच राजकारण तापले आहे. तृणमूल काँग्रेसकडून सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपानेदेखील कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. डावे पक्ष एकत्रित येऊन काँग्रेससमवेत हातमिळवणी करत ममतांविरोधात मजबूत आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जागावाटपाच्या मुद्यावरुन घोडे अडलेले आहे. अशा स्थितीत काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाले तर अस्तित्व वाचविण्याचा संघर्ष करणाऱ्या डाव्यांसाठी तो मोठा धक्का ठरु शकतो.
तृणमूलचे मागील काही काळापासून सातत्याने बंगालमध्ये वर्चस्व राहिले आहे तर भाजपाने मागील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगलीच मुसंडी मारली व मतांच्या टक्केवारीत दुसरे स्थान मिळविले. काँग्रेस व डाव्या पक्षांसाठी मात्र यंदाची निवडणूक ही करो या मरोची ठरणार आहे. बंगालमधील काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचे प्रमाण व जागांचे प्रमाण हे सातत्याने कमी होत आहे. त्यातच मालदा येथील खासदार मौसम नूर व काही आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे अनेक दशके बंगालवर वर्चस्व गाजविल्यानंतर आजच्या तारखेत डाव्या पक्षांची स्थिती खिळखिळी झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून मतदारांना परत खेचण्यासाठी डाव्या पक्षांनी एकत्रित मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
‘माकपा’ च्या नेतृत्वात, भाकपा, आरएसपी (रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टी) व ‘फॉरवर्ड ब्लॉक’ एकत्र आले आहेत. सुरुवातीला काँग्रेसलादेखील या आघाडीत आणण्यासाठी डाव्या नेतृत्वाने राजी केले होते. मात्र जागावाटपामुळे आघाडीच्या गाडीला ब्रेक लागले आहेत.
काँग्रेसला लोकसभेच्या १८ जागा हव्या आहेत तर डावे पक्ष त्यांना केवळ १२ जागा देण्यासाठी तयार आहे. सद्य:स्थितीत रायगंज व मुर्शिदाबाद या दोन जागांवर ‘माकपा’ चे खासदार आहेत. मात्र मागील पाच वर्षांत आम्ही आमचा जनसंपर्क जास्त वाढविला असून मतदार आमच्याकडे आले आहेत, असा दावा करत काँग्रेसने या दोन जागा मागितल्या आहेत. शिवाय पुरुलिया, कूचबिहार व बरसात या जागांवरदेखील काँग्रेसने दावा केला आहे. परंतु येथून आपले उमेदवार उभे राहणार असल्याचा प्रचार-प्रसार ‘फॉरवर्ड ब्लॉक’ने सुरू केला आहे. ते कुठल्याही परिस्थितीत या जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसने अद्यापपर्यंत आघाडीत सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भूमिका ठरविण्याचे सर्व अधिकार प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने सर्व जागांवर समांतरपणे उमेदवार पडताळणीदेखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
>भाजपकडून २०० सभांच्या आयोजनाची तयारी
दरम्यान, भाजप बंगालमध्ये ‘मिशन-२३’ घेऊन उतरत आहे. २०१४ च्या निवडणुकांत सुमारे पाच ते सहा जागांवर भाजपाचे उमेदवार दुसºया तर ३० जागांवर तिसºया स्थानी होते. या सर्व जागांवर भाजपाने जोर लावला आहे. बांगलादेशी घुसखोर, भ्रष्टाचार याशिवाय नागरिकत्व विधेयक यावर भाजपाचा भर राहणार आहे. भाजपाकडून येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या प्रचाराचा धुराळा उडविण्यात येणार आहे. विविध नेत्यांच्या जवळपास २०० सभांचे आयोजन करण्याचा पक्षाचा मानस आहे.
>तृणमूलविरोधात
सर्वच पक्ष आक्रमक
सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलेले आहे. यावरुन भाजपा, डावे
पक्ष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार हल्ला चढविला. येत्या काळात तृणमूलविरोधात आक्रमणाची धार आणखी वाढणार असेच चित्र दिसून येत आहे.

Web Title: Congress 'Ekla Chalo Re' in West Bengal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.