बालेकिल्ला राखण्याचे सेनेसमोर आव्हान, तिरंगी लढतीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:01 AM2019-03-04T05:01:19+5:302019-03-04T06:35:13+5:30

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़

Challenge ahead of arch-rivals, discussion of the tri-series | बालेकिल्ला राखण्याचे सेनेसमोर आव्हान, तिरंगी लढतीची चर्चा

बालेकिल्ला राखण्याचे सेनेसमोर आव्हान, तिरंगी लढतीची चर्चा

- अभिमन्यू कांबळे
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़
१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून १९७७ चा अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ १९९१ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. परभणीनेच शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून दिली. १९९१ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे अशोकराव देशमुख २०,१६१ मतांनी निवडून आले. त्यानंतर १९९८ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व आहे. आघाडीच्या जागा वाटपात २००४ मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला; परंतु, गेल्या तीन निवडणुकांमध्ये या पक्षाला विजय मिळविता आलेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत देशभर नरेंद्र मोदी यांची लाट असताना राष्ट्रवादीचे उमेदवार आ. विजय भांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना तगडी टक्कर दिली होती. यावेळेसही भांबळे यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत; परंतु, भांबळे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यांना जिंतूर विधानसभेत रस आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, माजी खा. सुरेश जाधव यांनीही उमेदवारी मागितली आहे; परंतु, या तिन्ही उमेदवारांपेक्षा भांबळे यांचेच नाव सध्या तरी आघाडीवर आहे. उमेदवारीच्या मतऐक्याबाबत दोनवेळा मुंबईत बैठक झाली; परंतु, एकमत झाले नाही. काँग्रेसनेही या मतदारसंघात चाचपणी केली आहे; परंतु, राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ सोडवून घेऊन तयारी करायची म्हटली तर काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांना पाथरी विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी अनुत्सुकता दर्शविली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे़ सहा महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात दोन वेळा दौरे केले. युती होण्यापूर्वी भाजपकडून बोर्डीकरांचेच नाव चर्चेत होते; आता त्या माघार घेणार की अन्य मार्ग अवलंबितात, याची उत्सुकता आहे़ बोर्डीकर या रिंगणात कायम राहिल्या तर तिरंगी लढत होईल आणि त्याचा परिणाम शिवसेनेचे उमेदवार खा़ जाधव यांच्या मतपेटीवर होवू शकतो़ विद्यमान खासदार जाधव हे पुन्हा शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली आहे; परंतु, सेनेतील अंतर्गत मतभेदही जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय झाला आहे. सेनेचे परभणीचे आ.राहुल पाटील आणि खा.जाधव यांच्यातील वाद मातोश्रीवर पोहोचला, तरीही मिटलेला नाही. शिवाय परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खा. जाधव यांचेही मतभेद मिटलेले नाहीत, हीदेखील शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. रावते यांना मानणारा परभणीत मतदार आहे. त्यामुळे या वादावर पुन्हा एकदा मातोश्रीवरून तोडगा निघाला तरच जाधव यांना सेनेचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याचा मार्ग सुकर होईल़
>सध्याची परिस्थिती
२०१४ च्या निवडणुकीत खा.संजय ऊर्फ बंडू जाधव यांना पक्षा व्यतिरिक्त आ.विजय भांबळे यांच्या विरोधातील कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनीही मदत केली होती. यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. खा. जाधव यांना मदत करणारे तत्कालीन सहकारी आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे एकमेकांना मदतीची भावना हे मित्रपक्ष कितपत बाळगतील याविषयी शंका उपस्थित होत आहे.मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरही शिवसेना- राष्ट्रवादीच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत़ परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी जिंतूर, गंगाखेड, घनसावंगी हे तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पाथरी, परतूर हे दोन मतदारसंघ भाजपाकडे आहेत आणि परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे़

Web Title: Challenge ahead of arch-rivals, discussion of the tri-series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.