सुरक्षिततेची दक्षता घेऊन पर्यटनाचा लुटा आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:31 AM2018-07-17T01:31:13+5:302018-07-17T01:31:18+5:30

पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण मावळातील विविध ठिकाणी भेट देतात.

Tourism enjoy the security of the security! | सुरक्षिततेची दक्षता घेऊन पर्यटनाचा लुटा आनंद!

सुरक्षिततेची दक्षता घेऊन पर्यटनाचा लुटा आनंद!

Next

पिंपरी : पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण मावळातील विविध ठिकाणी भेट देतात. भुशी धरण, लायन्स पॉइंट, भाजे लेणी, धबधबा, पवना धरण परिसर, लोहगड-विसापूर किल्ले ही पर्यटकांची आकर्षण केंद्रे असून, हुल्लडबाजी आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यामुळे पर्यटनस्थळी
आणि पर्यटनाच्या मार्गावर अपघाताच्या घटना घडण्याचे
प्रमाण वाढले आहे. सुरक्षिततेची दक्षता घ्या अन् पर्यटनाचा आनंद लुटा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. एवढेच नव्हे, तर अधिक वर्दळीच्या ठिकाणांवर पर्यटनास बंदी आणावी, अशी मागणी दुर्घटनेची झळ पोहोचलेल्या कुटुंबीयांकडून होऊ लागली आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत लोणावळ्यातील भुशी डॅम, तसेच मावळातील अन्य धबधब्यांवर महिनाभरात सहा दुर्घटना घडल्या आहेत. पवन मावळातील कठीणगड म्हणून ओळखल्या जाणाºया तुंग किल्ल्यावरून दरीत पडल्याने ईशिता मुकुंद माटे या पंधरावर्षीय मुलीचा मृत्यू होण्याची घटना नुकतीच घडली. १५ जुलैचा रविवार हा लोणावळ्यातील काळा रविवार ठरला आहे. तीन वेगवेगळ्या अपघाती घटनांमध्ये दहा जणांवर जीव गमावण्याची वेळ आली. घडलेल्या दुर्घटनांतून धडा घेण्याची गरज असताना, अशाच दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. पर्यटनाला निघण्यापासून ते प्रवास आणि पर्यटनस्थळी कोणती दक्षता घ्यावी, याबद्दल सांगण्याची वेळ आली असल्याचे पोलीस अधिकाºयांचे म्हणणे आहे.
>तरुणांची हुल्लडबाजी
परिसरातील तरुण ग्रुपने पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. तरुण वय, सळसळता उत्साह असलेले हे तरुण पर्यटनाला जाताना घरातील मोठ्या व्यक्तीला बरोबर घेऊन जाण्याचे टाळतात. त्याचे कारण त्यांना त्यांच्या मर्जीनुसार पर्यटनस्थळी धमाल करता येत नाही. पर्यटनाला जाताना आणि पर्यटनस्थळाजवळ हॉटेल, ढाबा दिसताच ते थांबतात. बरेचदा मद्य प्राशन करून मोटार चालवितात. पर्यटनस्थळीसुद्धा गर्दी दिसताच ते हुल्लडबाजी करतात. धबधब्याच्या ठिकाणी धोकादायक खोल दरी, तसेच ओढे-नाले या ठिकाणी जाण्याचा ते धोका पत्करतात. सर्वजण एकाच वयोगटातील असल्याने त्यांना कोणी नेमके मार्गदर्शन करीत नाही. त्याच वेळी इतर कोणाचे ऐकण्याची त्यांची मानसिकता नसते. त्यातूनच दुर्घटना घडतात. असे हुल्लडबाज स्वत:बरोबरच इतर निष्पापांचे आयुष्य पणाला लावतात, असा अनुभव पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केला.
>सेल्फीचा मोह धोकादायक
दुर्गम, टेकड्यांचा, खोल दरीचा परिसर असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर निसर्गरम्य वातावरणात मोबाइलवर फोटो काढण्याची सर्वांनाच घाई होते. सुरक्षेसाठी लावलेल्या कठड्यांच्या जवळ जाऊन जोखीम पत्करून तरुण-तरुणी फोटोकाढण्याचा प्रयत्न करतात. पावसामुळे निसरड्या झालेल्या भागात पाय घसरून पडण्याचा धोका असतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. टेकड्या, डोंगर-दºयातून पावसात फिरण्याचा यापूर्वी कधीही अनुभव घेतला नसला, तरी धोकादायक ठिकाणी जाण्याचे धाडस तरुण-तरुणी दाखवतात. त्यांच्या या अतिउत्साहीपणामुळे दुर्घटनेला निमंत्रण मिळते. हे अनेक घटनांतून निदर्शनास आले असताना त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न जिवावर बेततो आहे.
>भरधाव मोटारींमुळे अपघात
महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकडे मोटारी आहेत. या मोटारीतून तरुणांचे ग्रुपच्या ग्रुप पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करण्यास घराबाहेर पडतात. मद्याच्या धुंदीत मोटारीतील स्पीकर मोठ्या आवाजात लावून भरधाव मोटार चालविणारे स्वत:वर संकट ओढवून घेतात. त्याचबरोबर रस्त्याने ये-जा करणाºया इतरांपुढेही संकट निर्माण करतात. अशा हुल्लडबाजांमुळे केवळ पर्यटनस्थळीच नाही, तर पर्यटन स्थळाच्या मार्गावर अपघाताच्या घटना घडून येत आहेत. त्यात ज्यांचा पर्यटनाशी संबंध नाही, अशांचा नाहक बळी जात आहे.
>कौटुंबिक सहलीसाठी जाणाºयांची कुचंबणा
सुटीच्या दिवशी कुटुंबासह जवळच्या ठिकाणी पर्यटनास जाण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणांच्या टोळक्यांची हुल्लडबाजी, मद्यधुंद अवस्थेतील युवक, तसेच भरधाव मोटारी दिसून येतात. त्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे कुटुंबासह पर्यटनस्थळी जाण्याचे अनेकजण टाळतात. पर्यटनस्थळी महत्त्वाच्या धबधब्यांजवळ एखाद-दुसरा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दिसून येतो. परंतु डोंगर-कपाºयांमध्ये थोडे दूर अंतरावर घोळक्याने वावरणाºयांवर नियंत्रण आणण्यास यंत्रणा कशी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न पोलीस प्रशासनापुढे उपस्थित होत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी कुटुंबासह जाणे सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
>हुल्लडबाजी रोखण्यासाठी पर्यटनस्थळी बंदोबस्त
लोणावळा : तरुण पर्यटकांचा अतिउत्साह व हुल्लडबाजपणा यामुळे या दुर्घटना घडत आहेत. वास्तविक लोणावळा शहर व ग्रामीण भागात पावसाळी पर्यटनाकरिता येणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते. या पर्यटकांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक पर्यटनस्थळांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक ठिकाणी माहितीफलक लावण्यात आले आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली.
शनिवार व रविवार तसेच सुटीच्या काळात पर्यटकांना जागोजागी सूचना देण्याकरिता स्पिकर लावण्यात आले असून पेट्रोलिंग वाहनांमधून देखील सूचना दिल्या जात आहेत. पर्यटक संख्येच्या मानाने पोलीस बंदोबस्त कमी असला तरी पर्यटकांच्या सुरक्षेकरिता प्रत्येक पर्यटनस्थळांवर बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मागील काही काळात घडलेल्या घटनांमध्ये पर्यटकांचा अतिउत्साह व हुल्लडबाजपणाच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. पर्यटकांनी लोणावळा व ग्रामीण परिसरात पर्यटनस्थळांवर पर्यटनाचा व वर्षाविहाराचा आनंद घेताना स्वयंशिस्त पाळत स्वत:च्या जीविताची काळजी घेतल्यास दुर्घटना घडणार नाहीत असा विश्वास इंगवले यांनी व्यक्त केला.
पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच धरणाच्या पाण्यात उतरणे, दरीच्या तोंडाजवळ जाणे, गड किल्ले व डोंगरभागातील धबधब्यावर जाताना काळजी घ्यावी अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Tourism enjoy the security of the security!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.