पिंपरी-चिंचवड डायरी, शह-काटशहाचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 01:26 AM2018-11-12T01:26:41+5:302018-11-12T01:26:58+5:30

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. राष्टÑवादी, काँग्रेस, मनसे अशा अनेक पक्षांतून भाजपात दाखल झाल्याने

Pimpri-Chinchwad Diary, Chechnya's Politics | पिंपरी-चिंचवड डायरी, शह-काटशहाचे राजकारण

पिंपरी-चिंचवड डायरी, शह-काटशहाचे राजकारण

Next

भारतीय जनता पक्षाचे अटल महासंमेलन पिंपरी-चिंचवड शहरात झाले. त्यानिमित्ताने शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातही भाजपाने आपली ताकत दाखवून दिली. दोन मतदारसंघांवर दावा केल्याने शिवसेनेला घाम फुटला आहे. त्यामुळे युतीचे गुºहाळ दोन्ही पक्षांना लवकर संपवावे लागणार आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले. त्यातून कार्यकर्ते आणि हौसे-नवसे-गवसे यांचे लक्ष्मीदर्शनही होऊ लागले आहे.

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. राष्टÑवादी, काँग्रेस, मनसे अशा अनेक पक्षांतून भाजपात दाखल झाल्याने भाजपाची ताकत वाढली आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे मोहरे भाजपात आल्याने महापालिकेत एकमुखी सत्ता आणण्यात यश आले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. आठ दिवसांपूर्वी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर अटल महासंमेलन झाले. त्यास मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, पिंपरी, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या तालुक्यांतील, तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील भोसरी, हवेली, शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर भागातील कार्यकर्त्यांचीअलोट गर्दी होती. अर्थात भाजपाचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठीच हे संमेलन होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
संमेलनाची गर्दी ही दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यासाठी आली असल्याचे दिसून आले. त्यामध्ये दोन्ही जागांची मागणी आमदार जगताप आणि लांडगे यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये जे पिकते त्याची हवा राज्यात निर्माण होते. भाजपाला सक्षम करण्यासाठी या दोन्ही जागा मिळाव्यात. दोन खासदार संसदेत पाठविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील, असे मत जगतापांनी व्यक्त केले. तर आमदार लांडगेंनी विरोधकांवर शरसंधान साधले. आम्ही भाजपा सोडणार, असा अपप्रचार केला जातो, याचे कारण आमचा धसका विरोधकांनी घेतला आहे. दोन्ही मतदारसंघ भाजपाला मिळायलाच हवेत, अशी मागणी लांडगे यांनी केली. ‘पैलवानाचा नाद करायचा नाय’ असा गर्भित इशाराही विरोधकांना दिला.
वास्तविक भाजपाच्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते, मात्र ते सक्षमपणे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी या जागांवर दावा करून ताकत देणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील युती सरकारमुळे त्यांनी उघडपणे मत व्यक्त करणे टाळले. मोदींचे हात बळकट करण्यासाठी समविचारी खासदारांना दिल्लीत पाठवू. तसे न झाल्यास व्यासपीठावरील दोघांचे हात बळकट करू, असे सूचक विधान केले. मुख्यमंत्र्यांचा रोख नक्की कोणाकडे होता हे कळलेच नाही. वास्तविकपणे दोघांचे म्हणजे नक्की कोणाचे, हेही स्पष्ट झाले नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही, शिवेसनेच्या जागांवर दावा करण्यासाठी मेळावा नसून संघटनात्मक बांधणीसाठी आहे, असे स्पष्ट करून ‘अजित पवारांच्या दारात पोलीस उभे आहेत’ असे वादग्रस्त विधान करून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल या मेळाव्यातून फुंकले आहे. प्रमुख नेत्यांच्या भाषणावरून युतीबाबत सावध भूमिका भाजपा घेत असल्याचे दिसून आले. असे जरी असले, तरी या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपात चैतन्य निर्माण झाले आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे शिवसेनेला कंबर कसून काम करावे लागणार आहे. भाजपाने बूथनिहाय नियोजन केले आहे. खरे तर अटल संमेलन ही शिवसेनेसाठीधोक्याची घंटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मावळ आणि शिरूरचा शिवसेनेचा गड राखायचा असेल, तर युती होईल, नाही होईल, तोपर्यंत दोन्ही मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करणे गरजेचे आहे. युती न झाल्यास विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपाच्या मोठ्या आव्हानास सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत जीभ पोळल्याने काँग्रेस, राष्टÑवादीलाही संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे अन्यथा बैल गेला नि झोपा केला, अशी गत होऊ शकते.
या मेळाव्यानंतर आलेल्या दिवाळीत कार्यकर्त्यांची झालेली चांदी, भाजपा आणि राष्टÑवादीचे लक्ष्मीदर्शनही चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षप्रतिमा, नीतीला तडा जाणार नाही, याची काळजी उभय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेणे गरजेचे आहे. अटल संमेलन शक्तिप्रदर्शनाचा भाग असला, तरी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला भाजपा हा सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो, याचे भान संबंधित नेत्यांनी ठेवायला हवे.

भाजपाचे अटल महासंमेलन शहरात झाले. त्यानिमित्ताने शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातही भाजपाने आपली ताकत दाखवून दिली. दोन मतदारसंघांवर दावा केल्याने शिवसेनेला घाम फुटला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले.

- विश्वास मोरे

Web Title: Pimpri-Chinchwad Diary, Chechnya's Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.