'म्हातोबाच्या नावानं चांगभलं', जयघोषात दणाणली हिंजवडी; हजारो भविकांच्या उपस्थितीत निघाली बगाड मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:13 PM2024-04-23T19:13:30+5:302024-04-23T19:13:38+5:30

बगाड मिरवणूक वाकड हद्दीत येताच, कस्तुरी चौकात बगाडावर क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली

'Mhatoba's name is good', Hinjewadi burst into cheers; Bagad procession started in the presence of thousands of devotees | 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं', जयघोषात दणाणली हिंजवडी; हजारो भविकांच्या उपस्थितीत निघाली बगाड मिरवणूक

'म्हातोबाच्या नावानं चांगभलं', जयघोषात दणाणली हिंजवडी; हजारो भविकांच्या उपस्थितीत निघाली बगाड मिरवणूक

हिंजवडी : ग्रामदैवत असलेल्या श्री.म्हातोबा देवाची पारंपरिक बगाड मिरवणूक हजारो भविकांच्या उपस्थितीत हलगी, तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात, खोबरं भंडाऱ्याची उधळण करत, पैस.. पैस... म्हातोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात पार पडली. गावठाण पासून बगाड मिरवणूकीला सुरुवात होताच, उपस्थित हजारो भाविकांनी म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत हिंजवडी परिसर अक्षरशः दणाणून सोडला. 

दरम्यान, मंगळवार (दि.२३) रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास हिंजवडी गावठाण येथील, होळी पायथा मैदानापासून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. परंपरेनुसार बगाड साठी गळकरी होण्याचा मान जांभूळकर वाड्यातील तरूणांना असतो. बगाडाचा रथ रिंगण मैदानात आल्यावर किसन साखरे (पाटील) यांनी उमेश दिगंबर जांभूळकर यांची गळकरी म्हणून घोषणा केली. साखरे यांनी गळकऱ्याला गळ टोचला आणि कडाडणाऱ्या तुतारी, हलगीच्या आवाजात भंडाऱ्याची उधळण करत पैस.. पैस... म्हातोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा संग्राम साखरे आणि अतुल साखरे यांना खांदेकरी होण्याचा मान मिळाला. सायंकाळी पाचच्या सुमारास खांदेकरऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले. नंतर, बगाडावर बसवून हजारो भाविकांच्या उपस्थितीत हिंजवडी गावठाण, कस्तुरी चौक, भुमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्ती यामार्गे बगाड वाकड गावामध्ये दाखल झाले. बगाड ओढण्यासाठी वाकड आणी हिंजवडीतील ग्रामस्थांनी खास सजवून आणलेल्या बैल जोड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वाकड मधील म्हातोबाच्या मंदिरात बगाड मिरवणुकीची सांगता करण्यात आली. 

कस्तुरी चौकात बगाडवर पुष्पवृष्टी 

बगाड मिरवणूक वाकड हद्दीत येताच, कस्तुरी चौकात बगाडावर क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी, भविकांसाठी थंड पाण्याची सोय करण्यात आली होती. वाकड, कस्तुरी चौक येथील, माय माऊली प्रतिष्ठाण व धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ यांनी याचे आयोजन केले होते. 

Web Title: 'Mhatoba's name is good', Hinjewadi burst into cheers; Bagad procession started in the presence of thousands of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.