मक्याच्या शेतात गांजाचे पिक; शेतकऱ्याकडून १० फूट उंचीची ६६ झाडे आणि ११ लाखांचा गांजा जप्त

By नारायण बडगुजर | Published: April 23, 2024 06:41 PM2024-04-23T18:41:44+5:302024-04-23T18:41:51+5:30

चाकण पोलिसांना आगरवाडी रस्त्यावरील एका शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली होती

Marijuana crops in corn fields 66 plants of 10 feet height and ganja worth 11 lakhs seized from the farmer | मक्याच्या शेतात गांजाचे पिक; शेतकऱ्याकडून १० फूट उंचीची ६६ झाडे आणि ११ लाखांचा गांजा जप्त

मक्याच्या शेतात गांजाचे पिक; शेतकऱ्याकडून १० फूट उंचीची ६६ झाडे आणि ११ लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतात गांजाची ६६ झाडे लावली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. तसेच ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा २३ किलो गांजा जप्त केला. चाकण जवळील आगरवाडी येथे सोमवारी (दि. २२) दुपारी ही कारवाई केली.

सदाशिव आप्पासाहेब देशमुख (६५, रा. आगरवाडी रस्ता, चाकण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना आगरवाडी रस्त्यावरील एका शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, चाकण पोलिसांनी चाकण-काळूस रस्त्यावरील सदाशिव देशमुख यांच्या शेतात जाऊन खात्री केली. त्यावेळी मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. आठ ते दहा फूट उंचीची ६६ झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन २३ किलो होते. तर याची किंमत ११ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली. 

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक (गुन्हे) संदीप पाटील, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलिस अंमलदार राजू जाधव, हनुमंत कांबळे, रेवन्नाथ खेडकर, नवनाथ खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Marijuana crops in corn fields 66 plants of 10 feet height and ganja worth 11 lakhs seized from the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.