वाकड, दि. 13 - सुरक्षारक्षक म्हटलं की प्रत्येकाला एक विश्वास, दिलासा आणि सुरक्षितता असल्याचे वाटते. सुरक्षा रक्षकांच्या जीवावर अनेक मोठ्या कंपन्या बँका, सोसायट्या आणि कार्यालयांची जबाबदारी सोपवून सर्वजण अगदी बिनधास्त असतात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा रक्षकांच्या अघोरी प्रकाराने जणू कुंपणच शेत खाल्ल्याचा प्रत्यय आला. सोसायटीची सुरक्षा पाहणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांनीच पाच वर्षांच्या चिमुरडीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 
याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दोघा नराधमांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकळया आहेत. तसेच, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संजीत चासा (वय २०) आणि मंगल वैद (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. 
याबाबत वाकड ठाण्याच्या सहपोलीस निरीक्षक दीपाली आढाव यांनी दिलेली माहिती अशी की,  पाच वर्षांची चिमुरडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असताना नराधम सुरक्षारक्षकांनी खाऊचे अमिष दाखवून लिफ्ट शेजारील बाकड्यावर आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. तसेच, याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकीही तिला त्या दोघांनी दिली. हा प्रकार आठ दिवसांपूर्वी दोन तीन वेळा झाल्याचे त्या चिमुरडीने पोलिसांना सांगितले आहे.
या अत्याचाराने ती जखमी झाल्याबाबत त्या नाराधम सुरक्षारक्षकांना सांगत असताना तीच्या मोठ्या भावाने ऐकले आणि त्याने तिच्या आई वडिलांनी सांगितले. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला तिच्या पालकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. यावेळी सर्व सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी तिच्या पुढे उभे केले असता तिने त्या दोन नराधमांना ओळखले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.