"गाढवाच्या अंगी चंदनाची उटी..." उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 10:15 PM2024-03-09T22:15:46+5:302024-03-09T22:16:25+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले.

Devendra Fadnavis Targets Uddhav Thackeray in Pimpari Chinchwad, Pune | "गाढवाच्या अंगी चंदनाची उटी..." उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा

"गाढवाच्या अंगी चंदनाची उटी..." उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा

 पिंपरी : गाढवाच्या अंगी चंदनाची उटी राखे सवी भेटी गेली तडे, हा तुकाराम महाराज यांचा प्रचलित अभंग आहे. याचाच अर्थ गाढवाला कितीही चंदन उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊन राख अंगाला लावून घेणारच आहे. सध्याच्या राजकारणात अनेक लोक विविध नाटक करत आहेत. पण नागरिक सुज्ञ असून लवकरच कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याच्या वेदना होणार आहेत हेही लक्षात ठेवावे, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
 
फडणवीस म्हणाले, "सध्या राज्यामध्ये राजकीय धुराळा सुरू आहे. दररोज कोणीतरी अंगाला राख लावून घेत आहे. या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने नाट्यगृह बांधण्यात आले आहे. या नाट्यगृहात तुम्ही चांगले नाटक बघाल. पण काहीजण नाट्यगृहाबाहेर नाटक करत आहेत. मनात येईल तसं कथाकथन रचले जात आहे. मानअपमानाचे वेगवेगळे अंक होत आहेत. नटसम्राट सारखे वागले म्हणजे नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारण्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मात्र या राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे संबंधित राजकारणी कसेही वागले तरी कट्यार काळजात घुसणार आहे आणि मग वेदना होणारच आहेत. कारण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा डंपर कधीच पलटी केला आहे. "

Web Title: Devendra Fadnavis Targets Uddhav Thackeray in Pimpari Chinchwad, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.