भोसरी : नाट्यगृह उरले केवळ स्नेहसंमेलनापुरते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:49 AM2017-12-02T02:49:13+5:302017-12-02T02:49:20+5:30

वर्षात एखादे नाटक झाले तर नवलच, शिवाय नाटकाचा प्रयोग झाला तर कलाकारांपेक्षा प्रेक्षक कमी अशी स्थिती. नाटकं का होत नाहीत व झालीच तर काय अडचणी येतात याचे ही उत्तरे नाहीत. भलेही नाटकांचा प्रेक्षक कमी झाला असेल.

 Bhosari: Theater is only for the sake of fondness! | भोसरी : नाट्यगृह उरले केवळ स्नेहसंमेलनापुरते!

भोसरी : नाट्यगृह उरले केवळ स्नेहसंमेलनापुरते!

Next

- नितीन शिंदे
भोसरी : वर्षात एखादे नाटक झाले तर नवलच, शिवाय नाटकाचा प्रयोग झाला तर कलाकारांपेक्षा प्रेक्षक कमी अशी स्थिती. नाटकं का होत नाहीत व झालीच तर काय अडचणी येतात याचे ही उत्तरे नाहीत. भलेही नाटकांचा प्रेक्षक कमी झाला असेल. पण वर्षात एक ही नाटक होत नाही, ही परिस्थिती आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची. येथे कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते; पण ज्या उद्देशासाठी नाट्यगृहाची निर्मिती झाली तो उद्देश मात्र सफल होताना दिसत नाही. नाट्यगृह उभारून सात वर्षे होत आली तरी दोन अंकी संख्या होईल एवढीही नाटके व्यवसायानिमित्त या ठिकाणी आली नाहीत. किंवा कोणी प्रयत्न ही केला नाही हे वास्तव आहे. याबाबत येथील सर्वच राजकीय पदाधिकारी उदासीन असल्याचे चित्र पाहवयास मिळत असून, प्रशासनालाही फिकीर नसल्याने सध्या तरी नाट्यगृह फक्त आणि फक्त शाळा कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलना पुरतेच उरले आहे.
गेल्या सात वर्षांत व्यावसायिक नाट्यप्रयोगांनी साधी दोन अंकी संख्या ओलांडेल, एवढी नाटके येथे तिकीट विक्रीवर आणली नाहीत. हे अपयश कोणाचे? सध्या नाटकाचा प्रेक्षक भलेही कमी झाला असेल; पण शहरातील इतर नाट्यगृहाच्या तुलनेने काही तरी प्रयोग होणे गरजेचे आहे. नाही म्हणायला नाट्यगृहाने उत्पन्न चालू ठेवले आहे. पण खर्च ही दुपटीने आहे. नाट्यगृह पांढºया हत्तीप्रमाणे आहे. ते पोसणे कठीण काम आहे.
पण शहरातील नाटक परंपरा टिकवायची असेल, व शहरवासीयांची सांस्कृतिक भूक भागावी, अशी नाट्यगृहे असली पाहिजेत़ पण चांगली नाटके होत नाहीत किंवा त्यासाठी प्रयत्न ही होत नाही.
इतर कार्यक्रमांच्या तुलनेत नाटकांसाठी भाडे ही अत्यंत नगण्य आहे. तरीही सर्वच नाटक संस्था व कलाकार भोसरीकडे पाठ का फिरवतात.

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह २०१० मध्ये बांधण्यात आले.
२०११ मध्ये येथे कार्यक्रमांची सुरुवात झाली. या नाट्यगृहाचा घेतलेला हा आढावा..

२०११/२०१२ : ३१६ कार्यक्रम, ४१४०५४४ रुपये उत्पन्न
२०१२/२०१३ : ३२२ कार्यक्रम, ४४३५७०० रुपये उत्पन्न
२०१३/२०१४ : ३२० कार्यक्रम, ५५१०६९७ रुपये उत्पन्न
२०१४/२०१५ : ३५० कार्यक्रम, ५६०२०२० रुपये उत्पन्न
२०१५/२०१६ : ३६८ कार्यक्रम, ६३६८६०५ रुपये उत्पन्न
२०१६/२०१७ : ३९८ कार्यक्रम, ७४१०६१६ रुपये उत्पन्न

सर्व कारभार पेन्सिलचा...
नाट्यगृहात असणाºया सर्वच कार्यक्रमांची नोंद पेन्सिलने केली जात असून, ही बाब अतिशय गंभीर आहे. ही नोंद फक्त होणाºया कार्यक्रमांची नसून गेल्या चार पाच वर्षांत झालेल्या सर्वच कार्यक्रमांची आहे. कोणतीही ठळक नोंद आढळत नसून, पेन्सिलच्या नोंदीमुळे काही ठिकाणी खाडाखोड आहे. याबाबत माहिती घेतली असता अनेक वेळा कार्यक्रम बदलतात त्यामुळे पेन्सिलचा वापर केला जात आहे.
नाट्यगृहाचा खर्च वर्षाला दीड कोटी
येथे असणारे कर्मचारी पगार, दुरुस्ती, वीज व इतर सर्व खर्च दीड कोटींच्या आसपास आहे. आजपर्यंत खर्चाच्या निम्मानेही उत्पन्न मिळाले नाही आणि सात वर्षांत झालेल्या कार्यक्रामध्ये कोणत्याही नाट्यसंस्थेने व कलाकारांनी आणलेले प्रयोग दोन अंकी संख्ये एवढेसुद्धा आणले नाहीत. विविध संस्थानी फुकट ठेवलेल्या नाटकांकडे ही इथला प्रेक्षक फिरकला नाही.

२०१० मध्ये भोसरीत नाट्यपरंपरा रुजावी व भोसरीची सांस्कृतिक ओळख वाढवावी, यासाठी पुणे नाशिक रस्त्यालगत सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात आले. पूर्वीच्या काळात भोसरीची ओळख जशी कुस्ती म्हणून होती तशी नाट्यक्षेत्रातसुद्धा या गावाचा दबदबा होता. कवी अनंत फंदी, होनाजी बाळा, सखाराम बाइंडर या नाटकांच्या माध्यमातून सोपानराव फुगे, नामदेवराव माने पाटील, सखाराम डोळस आदी नी भोसरीचे नाव राज्यभर पसरविले. एकेकाळी असलेली भोसरीची नाट्यपरंपरा टिकावी, यासाठी महापालिकेच्या वतीने भव्य नाट्यगृह उभारण्यात आले आहे. मात्र नाटक हे फक्त या ‘नाट्य’गृहाच्या नावातच राहिले आहे.

भोसरीत स्वत: हून कोणतीही नाटक संस्था प्रयोग करायला येत नाही. कामगार नगरी असल्याने नाटकाचे तिकीट दर कमी असावेत व नाटक संस्थांनी व कलाकारांनी मानधन कमी केले तर प्रयोगाची संख्या वाढेल. सर्वच क्षेत्रांतील लोकांनी नाटके या भागात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- दिलीप फुगे, प्रभारी व्यवस्थापक, अंकुशराव लांडगे नाट्यगृह

Web Title:  Bhosari: Theater is only for the sake of fondness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.