२०२४ मध्ये मतदान न केल्यास बँक खात्यातून ३५० रुपये कापले जाणार? जाणून घ्या सत्य

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 05:13 PM2020-11-24T17:13:06+5:302021-01-27T14:16:00+5:30

मतदानाचा टक्का वाढावा, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रयत्न केले जातात.

मतदान केंद्रावरील सुविधा वाढवण्यासोबतच मतदार यादी अपडेट ठेवण्याचं, जनजागृती करण्याचं काम निवडणूक आयोगाकडून करण्यात येतं. मात्र तरीही बरेचसे मतदार मतदान करत नाहीत.

अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात. मतदान केंद्र जवळ असूनही मतदानाचा हक्क न बजावणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

बहुसंख्य मतदार मतदान करत नसल्यानं २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

२०२४ मध्य होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्या बँक खात्यातून ३५० रुपये कापले जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२०२४ च्या निवडणुकीत एखाद्या मतदारानं मतदान न केल्यास आधारकार्डच्या माध्यमातून त्याची ओळख पटवली जाईल. याच कार्डला लिंक असलेल्या त्याच्या खात्यातून ३५० रुपये कापले जातील, असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निवडणूक आयोगानं यासंदर्भात सर्व बँकांना सूचना दिल्या असल्याचं वृत्त व्हायरल झालं असून त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रवक्यांच्या विधानाचाही संदर्भ देण्यात आला आहे.

मतदान यंत्रणा उभारण्यासाठी निवडणूक आयोग बराच खर्च करतो. मात्र कोट्यवधी लोक मतदान करत नसल्यानं हा खर्च वाया जातो. त्यामुळेच हे पाऊल उचलण्याचा दावा केला जात आहे.

निवडणूक आयोगानं या प्रकरणात आधीच न्यायालयाची परवानगी घेतली आहे. कोणीही न्यायालयात धाव घेऊ नये यासाठी आयोगानं खबरदारी घेतल्याची माहिती व्हायरल मेसेजमध्ये आहे.

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोनं मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. व्हायरल मेसेज पूर्णपणे तथ्यहीन असल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.