३६ जणांचा बळी, अखेर इंदूरमधील त्या मंदिरावर चालला बुलडोझर, प्रशासनाची कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:17 PM2023-04-03T17:17:26+5:302023-04-03T17:20:54+5:30

Beleshwar Mahadev Mandir Indore: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रामनवमी दिवशी बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने या मंदिरात असलेली विहीर भराव टाकून भरली. तसेच जवळच बांधण्यात येत असलेल्या शिवमंदिरावरही बुलडोझर चालवला. आज पहाटे ५ वाजल्यापासून पालिकेने कारवाईला सुरुवात केली. त्याआधी मंदिरातील देवदेवांच्या मूर्ती हटवण्यात आल्या.

मध्य प्रदेशमधील इंदूर येथे रामनवमी दिवशी बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने या मंदिरात असलेली विहीर भराव टाकून भरली. तसेच जवळच बांधण्यात येत असलेल्या शिवमंदिरावरही बुलडोझर चालवला. आज पहाटे ५ वाजल्यापासून पालिकेने कारवाईला सुरुवात केली. त्याआधी मंदिरातील देवदेवांच्या मूर्ती हटवण्यात आल्या.

या मंदिरातील एकेका मूर्तीचं वजन सुमारे ४०० किलोच्या आसपास होतं. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात जेसीबी चालवण्यास सुरुवात करण्यात आली. काही रहिवाशांनी आणि हिंदू संघटनांनी बांधकाम सुरू असलेलं मंदिर तोडण्यास विरोध केला. मात्र मोठ्या प्रमाणावर तैनात असलेलेल पोलीस आणि प्रशासनामुळे विरोध फार काळ टिकू शकला नाही. रहिवाशांनी हे मंदिर लोकवर्गणीतून बांधण्यात येत असल्याचे सांगून ते तोडण्यास विरोध केला. मात्र हा विरोध फार काळ चालू शकला नाही.

या संपूर्ण कारवाईमध्ये महानगरपालिका, जिल्हा आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. नगर निगमचे अतिरिक्त आयुक्त सिद्धार्थ जैन यांनी सांगितले की, संपूर्ण कारवाईसाठी २५० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. चार पोकलेन मशीन आणि ४ जेसीबी मशीनच्या मदतीने हे मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी सुरक्षेसाठी ४ पोलीस ठाण्यातील २०० हून अधिक पोलीस जवान तैनात होते.

मंदिरातून सर्वप्रथम विधिवत भगवान झुलेलाल, शिवशंकर, माताजी, गणपती, मारुती आणि भेरूबाब यांच्या मूर्ती दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यानंतर नवीन बांधकाम सुरू असलेले मंदिर आणि जुने मंदिर तोडण्यात आले.

दोन ते तीन तास जेसीबी, पोकलेन मशीन चालवून मंदिर पूर्णपणे भूईसपाट करण्यात आलं. दरम्यान, या मंदिरात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर ट्रस्टचे सचिव मुरली सबनानी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबानानी हेसुद्धा या दुर्घटनेत जखमी झाले होते.

दरम्यान, या दुर्घटनेपूर्वीचा काही वेळ आधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुमारे ४० जण बसलेले दिसत आहेत. तसेच ट्रस्टचे सचिव मुरली सबनानी यांच्यासह १४ जण हवन करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे १० ते १२ जण बसलेले आहेत. तर काही जण मंदिरामध्ये मूर्तींवर अभिषेक करताना दिसत आहेत. तर काही जण मागे उभे राहिलेले दिसत आहेत. स्थानिकांच्या मते हा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळ आधीचा आहे.