Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर तो डीव्हीआर, लॅपटॉप, सीसीटीव्ही घेऊन पळाला; प्रकरण वेगळ्या वळणावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:27 AM2022-09-01T09:27:04+5:302022-09-01T09:50:49+5:30

Sonali Phogat: सोनाली फोगाट खून प्रकरणी मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार हणजूण पोलिसांनी कर्लीस बार टाळे ठोकले.

टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्याकांड प्रकरणात हरयाणा पोलिसांनी कॉम्प्युटर ऑपरेटर शिवम याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्याकडून एक लॅपटॉप व फोन जप्त केला आहे. तसेच बेपत्ता झालेला डीव्हीआरही जप्त केला आहे. तसेच बेपत्ता झालेला डीव्हीआर, लॅपटॉप व सीसीटीव्ही कॅमेरा त्याने गायब केल्याचा आरोप सोनाली यांच्या कुटुंबातील लोकांनी केला होता.

एसएचओ मनदीप चहल यांनी सांगितले की, शिवम हा उत्तर प्रदेशातील मेरठ-गाजियाबाद भागातील रहिवासी आहे. गोवा पोलीसही त्याची चौकशी करणार आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गोवा पोलीस हिसारमध्ये दाखल झाले आहेत. शिवमचा फोन कॉल तपशील शोधला जात आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर सांगवान याने त्याला किती वाजता फोन केला होता, याची माहिती घेतली जात आहे.

शिवम आणखी कोणाच्या संपर्काति होता, याची माहिती घेतली जात आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर डीव्हीआर, लॅपटॉप व अन्य दस्तावेज घेऊन तो का पळाला होता? पोलिसांना मिळालेल्या डीव्हीआरमध्ये मागील पाच महिन्यांचे रेकॉर्ड नाही. ते रेकॉर्ड कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोनाली फोगाट खून प्रकरणी मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार हणजूण पोलिसांनी कर्लीस बार टाळे ठोकले. याच क्लबमध्ये सोनाली फोगाट हिला जबरदस्तीने अंमली पदार्थ पाजला होते. सोनालीच्या मृत्यूनंतर तपासात बारच्या बाथरूममध्ये मेटाफेथामाईन ड्रग्ज सापडले होते. त्यावेळी पोलिसांकडून संपूर्ण बार सील करण्यात आला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हणजूण पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असताना आता सोनालीच्या मृत्यूचा कट हरयाणात रचल्याची माहिती समोर येत आहे. सोनालीचा तिचा स्वीय सहाय्यक तथा सोनालीच्या खुनाचा मुख्य संशयित सुधीर सांगवान व मित्र सुखविंदर सिंग यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

दरम्यान, सोनाली फोगाट या ११० कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. त्यांची मुलगी यशोधरा (१५) ही या संपत्तीची वारसदार आहे. सोनाली यांचे पती संजय फोगाट यांचा सहा वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला होता. यशोधरा यांच्या जिवाला धोका असून तिला सुरक्षा देण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. सोनाली फोगाट यांच्या नावावर पती संजय यांच्या हिश्श्याची १३ एकर जमीन आहे. हिसारमध्ये सहा एकरमध्ये फार्म हाउस आणि रिसॉर्ट आहे. संतनगरमध्ये निवासस्थान आणि दुकान आहे. गुरुग्राममध्ये दोन फ्लॅट आहेत. यशोधरा ही २१ वर्षांपर्यंत नातेवाइकांच्या संरक्षणात राहील.