NitishKumar Survey: देशाचा मूड बदलू लागला! मोदींना टक्कर कोण देणार? नितीशकुमारांवर सर्व्हे आला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 05:54 PM2022-09-10T17:54:10+5:302022-09-10T17:58:21+5:30

Loksabha Election Survey of 2024: लोकसभा निवडणुकीला १८ च महिने राहिले... एक नेता करतोय 'आपलीच हवा', भाजपाच्या गोटात मोठी अस्वस्थता

लोकसभा निवडणुकीला आता १८ महिनेच राहिले आहेत. असे असताना भाजपासह राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तय़ारी सुरु केली आहे. भाजपाकडे जरी मोदी असले तरी विरोधकांची शकले झाल्याने त्यांच्याकडे नेता नाहीय. विरोधक एकमेकांना मोठे होऊ देत नाहीएत. यामुळे भाजपाने एकहाती सत्ता राखण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच एबीपी न्यूजचा एक महत्वाचा सर्व्हे आला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरणार आहे.

देशाचा राजकीय मूड काय आहे, यावर हा सर्व्हे करण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ऐन टायमिंगला भाजपासोबत खेळ केला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी देत त्यांनी राजदशी गट्टी जमवत देशभरात चर्चेत आले आहेत. नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्यात यशस्वी ठरतील का या प्रश्नावर जनतेतून ५६ टक्के लोकांचा होकार आला आहे. परंतू, ते विरोधकांचे नेते बनले तर भाजपालाच फायदा होईल असेही या बहुतांश लोकांचे मत आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला कितपत फायदा होईल असे विचारले असता, ५० टक्के लोकांनी काँग्रेसला फायदा होणार असल्याचे सांगितले आहे. तर ५० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तसेच काँग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या बाहेरचा झाला तर फायदा होईल का, असे विचारले असता ६४ टक्के लोकांनी अध्यक्ष गांधीं कुटुंबातील झाला तरच काँग्रेसला फायदा होईल असे सांगितले.

या सर्व्हेमध्ये केजरीवाल यांच्यावरही प्रश्न विचारण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल मोदींना आव्हान देऊ शकतात का, या प्रश्नावर ६७ टक्के लोकांनी हो असे उत्तर दिलेय. तर २३ टक्के लोकांनी केजरीवाल मोदींपुढे आव्हान उभे करू शकत नाहीत असे म्हटले आहे. केजरीवालांवर राजकीय तज्ज्ञांनी देखील मत व्यक्त केले आहे. केजरीवाल यांचे वागणे आहे, ते मोदींसारखेच आहे. केजरीवाल देखील भाजपाच्या ट्रोल आर्मीसारखीच आपली हवा करण्यात यशस्वी होतात, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशच्या मदरशांवर देखील सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. युपीच्या मदरशांचा सर्व्हे व्हायला हवा का, असे विचारण्यात आले. यावर ६९ टक्के लोकांनी सांगितले की, हो सर्व्हे व्हायला हवा. ३१ टक्के लोकांनी नाही अस उत्तर दिले. काँग्रेसनेही मदरशांचा सर्व्हे व्हावा अशी भूमिका घेतली आहे. परंतू, त्यामागे कारण काय आहे हे देखील पहावे असे म्हटले आहे. सरकारने चांगल्या नियतीने काम करायला हवे असे काँग्रेसने म्हटले आहे.