Corona Vaccination: कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:09 PM2022-01-04T12:09:17+5:302022-01-04T12:14:29+5:30

Corona Vaccination: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डेल्टा व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला. मात्र, आता ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धुमाकूळ वाढत चालला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशभरातील राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर निर्बंध घालणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण (Corona Vaccination) हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय असून, जगभरातील देश यावर भर देत आहे. इस्रायलसारख्या देशात तर बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. भारत सरकारही बुस्टर डोस देण्यावर गांभिर्याने विचार करत असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मात्र, यातच हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयाने महत्त्वाचा दावा केला आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरणार असून, यासंदर्भात ICMR ला शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा एक-एक डोस Mix&Match पद्धतीने देण्यात आल्यानंतर तब्बल चारपटीने अ‍ॅण्टीबॉडी विकसित झाल्या आहेत. लवकरच सुरू होणाऱ्या बुस्टर डोस लसीकरण मोहिमेत या कॉकटेल डोसचा वापर केल्यास अधिक फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन ICMR ला सोपवण्यात येणार आहे.

या चाचणीमध्ये ४४ जणांनी सहभाग घेतला होता. सर्वांची चार गटात विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटात ११ जणांचा समावेश होता. पहिल्या गटातील सर्व ११ जणांना कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले.

दुसऱ्या गटाला दोन्ही डोस कोव्हिशिल्डचे देण्यात आले. तसेच तिसऱ्या गटाला पहिला डोस कोव्हॅक्सिनचा व दुसरा कोव्हिशिल्डचा डोस देण्यात आला. तर, चौथ्या आणि शेवटच्या गटाला पहिला डोस कोव्हिशिल्ड व दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा देण्यात आला.

या गटातील ४४ लोकांवर ६० दिवस देखरेख ठेवण्यात आली. AIG रुग्णालयाच्या संशोधकांना आढळले की, एकाच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत ज्यांना संमिश्र डोस देण्यात आले. त्यांच्यात कोरोनाविरोधातील अ‍ॅण्टीबॉडी ४ पटीने अधिक वाढली आहे.

या चाचणीसाठी ३३० लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली होती. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही आणि ज्यांना कोरोनाची लागणही झाली नव्हती. मात्र, त्यातील फक्त ४४ लोकांच्या शरीरामध्ये कोरोनाविरोधात अ‍ॅण्टीबॉडी आढळल्या नाहीत.

या संशोधनात सहभागी असलेल्या डॉक्टरांनी म्हटले की, जर भारतात १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बुस्टर डोस लसीकरण मोहिमेत कॉकटेल डोस दिल्यास त्याचा अधिक फायदा होणार आहे.

याचाच अर्थ ज्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना कोव्हिशिल्ड आणि कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना कोव्हॅक्सिनचा डोस दिल्यास अधिक चांगले परिणाम दिसू शकतात, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, भारताने अमेरिका आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकत लसीकरण मोहिमेत सर्वांत आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून भारताने पात्र नागरिकांना पहिल्या डोसच्या ९० टक्के आणि दुसऱ्या डोसच्या ६५ टक्क्यांपेक्षा जास्त डोस दिले आहेत.