Congress Election: कशी होते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक? २२ वर्षे झालीच नाही...

By राजू इनामदार | Published: October 10, 2022 01:19 PM2022-10-10T13:19:32+5:302022-10-10T13:26:47+5:30

तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक झालीच, तर ती कशी व्हायला हवी याबद्दल पक्षाच्या घटनेत स्पष्ट उल्लेख आहे.

राजू इनामदार - तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक झालीच, तर ती कशी व्हायला हवी याबद्दल पक्षाच्या घटनेत स्पष्ट उल्लेख आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपद घ्यायला नकार दिल्यामुळे आता या पदासाठी निवडणूक होत आहे. ८२ वर्षांचे मल्लिकार्जुन खरगे व ६६ वर्षांचे शशी थरूर यांच्यात ही लढत होत आहे.

पक्षाने केंद्रीय स्तरावर मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती केली आहे. ते प्रत्येक राज्यात प्रदेश निरीक्षक नेमतात. ते राज्यातील शहर व गावांमधील पक्ष निवडणुकीसाठी निरीक्षक नेमतात. ते शहरांमधील ब्लॉक व बूथ कमिटीच्या निवडणुकीसाठी निरीक्षक नियुक्त करतात. पक्षाची तळापासूनची संघटनात्मक निवडणूक या निरीक्षकांच्या देखरेखीखाली होत असते.

प्रदेशकडून आलेल्या सदस्यांमधून १२ सदस्य या कार्यकारिणीवर निवडले जातात. अध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती त्याच्या पसंतीच्या ११ जणांची निवड करतो. पक्षाची सर्वोच्च समिती २३ जणांची असते. राष्ट्रीय अध्यक्ष या समितीचे प्रमुख असतात. पक्षासंबंधीचा कोणताही धोरणात्मक निर्णय या समितीच्या माध्यमातूनच घेतला जातो.

थेट नियुक्तीच देशातील सर्व राज्यांमधील बूथ, शहर तसेच राज्य स्तरावरील निवडणुका झाल्या. त्या नियुक्ती पद्धतीनेच केल्या गेल्या. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक झालीच तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २४ ते ३० सप्टेंबर अशी होती. आता प्रचार सुरू आहे. याआधीची निवडणूक सोनिया गांधी व जितेंद्र प्रसाद यांच्यात झाली होती. सोनिया गांधी यांचा विजय झाला होता.