लिंगबदल शस्त्रक्रिया नेमकी कशी करतात? परिणाम आणि थेरपी काय असते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 10:41 AM2022-11-10T10:41:02+5:302022-11-10T10:49:52+5:30

राजस्थानमध्ये नुकतेच एका प्राथमिक शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थिनीशी लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया कशी होते ते जाणून घेऊ...

लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित व्यक्तिला जेंडर डिस्फोरिया आहे का हे तपासले जाते. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाते.

कामविज्ञानतज्ज्ञाचा सल्ला घेऊन उपचारांची सुरुवात हार्मोनल थेरपीपासून केली जाते. म्हणजेच ज्या हार्मोनची गरज आहे ते औषधे आणि इंजेक्शनच्या माध्यमातून शरीरात टाकले जाते.

दोन - तीन डोस दिल्यानंतर परिणाम होण्यास सुरुवात होते. आपल्या मनासारखा हार्मोन मिळाल्यानंतर लोकांना चांगले वाटायला लागते. त्यामुळे ते खूश होतात.

शस्त्रक्रियेसाठी किमान वय २० वर्षे असणे आवश्यक आहे. २० वर्षांपेक्षा कमी वय असेल तर त्यासाठी आई- वडिलांची परवानगी आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास ५ ते ६ तास लागतात. यादरम्यान, संबंधिताच्या प्रायव्हेट पार्टसह शरीराच्या अन्य भागांवर काम केले जाते. यात प्लास्टिक सर्जनसोबत मानसोपचारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, न्युरोलॉजिस्ट यांची टीम असते. या शस्त्रक्रियेसाठी जवळपास १० लाखांपर्यंतचा खर्च येतो. मात्र, आता ५ लाख रुपयांमध्येही लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात येते, असे सांगण्यात येते.

महिला ते पुरुष बनण्यासाठी जवळपास ३३ टप्पे पार करावे लागतात. यात प्रायव्हेट पार्टसह चेहऱ्यावरील केस, नखे, हावभाव, हार्मोन, कानांचा आकार बदलला जातो. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते, त्यामुळे अनेक जण सर्व बदल करण्याऐवजी आवश्यक तेवढेच बदल करून घेतात.

महिला ते पुरुष बनण्याच्या तुलनेत पुरुष ते महिला बनणे सोपे असते. यात १८ प्रक्रिया असतात. जर कोणता पुरुष महिला बनत असेल तर त्याच्या शरीराच्या भागापासूनच शस्त्रक्रियेच्या माध्यमातून महिलांसाठी आवश्यक असणारे भाग तयार केले जातात. यासाठी जवळपास ४ तास लागतात, तर स्तनांसाठी दोन तासांचे ॲापरेशन असते. ही दोन्ही ॲापरेशन तीन ते चार महिन्यांच्या अंतराने केली जातात.