नाव ऐकून कापायचे गुन्हेगार, मग कृष्णभक्तीसाठी सोडली IGची नोकरी, कोण आहेत त्या? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:49 PM2023-10-02T15:49:17+5:302023-10-02T15:52:36+5:30

Bharti Arora: आयएएस-आयपीएस अधिकारी बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागले. त्यानंतर यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पद, पैसा, प्रतिष्ठा मिळते. मात्र काही अधिकारी या सर्वांमुळे समाधानी होत नाहीत. त्यांच्यापैकी काहीं हा सगळा मानमरातब सोडून शांतीच्या शोधात ईश्वरभक्तीमध्ये गुंतले.

आयएएस-आयपीएस अधिकारी बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागले. त्यानंतर यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पद, पैसा, प्रतिष्ठा मिळते. मात्र काही अधिकारी या सर्वांमुळे समाधानी होत नाहीत. त्यांच्यापैकी काहीं हा सगळा मानमरातब सोडून शांतीच्या शोधात ईश्वरभक्तीमध्ये गुंतले.

अशाच एका महिला कॅडरचं नाव आहे आयपीएस भारती अरोडा. एकेकाळी डॅशिंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या अरोडा यांनी सर्व सोडून कृष्णभक्तीचा मार्ग अवलंबला. १९९८ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या भारती अरोडा यांनी हरियाणामधील अनेक जिल्ह्यांच्या एसपी आणि करनाल जिल्ह्याच्या आयजी म्हणूनही काम पाहिलं आहे. तसेच अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशीही केली आहे.

एक दबंग पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती. एसपी असताना त्यांनी बड्या नेत्यालाही बेड्या ठोकल्या होत्या. एवढंच नाही तर जिथे त्यांची नियुक्ती व्हायची तिथे गुन्हेगारांवर कारावाया करायला त्या मागेपुढे पाहत नसत. त्यांच्या या कामामुळे त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आलं होतं.

भारती ह्या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त होत्या. त्यांना वृंदावनामध्ये जायला खूप आवडायचे. त्या २००४ पासून तिथे जात होत्या. त्या कृष्णभक्तीध्ये एवढ्या लीन झाल्या की त्यांनी स्वत:ला कृष्णाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्यांनी त्यांचा सेवाकाल पूर्ण होण्याआधी दहा वर्षे आधीच निवृत्ती स्वीकारली. मीराबाईप्रमाणे कृष्णाची साधना करण्याची इच्छा आहे, असं त्या सांगायच्या.

अखेर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या सेवेमधून व्हीआरएस घेतला. सेवेच्या शेवटच्या दिवशी त्या भगव्या वेषभूषेमध्ये ऑफिसमध्ये पोहोचल्या. त्यावेळी त्या देशभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. भारती अरोडा यांचे वडील विकास अरोडा हेसुद्धा हरियाणा कॅडरमधील आयएपीएस अधिकारी आहेत. तसेच त्यांनी फरिदाबादमध्ये कमिश्नरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम पाहिलं आहे.