CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; ओडिशामध्ये एका दिवसात 138 चिमुकल्यांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:20 AM2021-08-16T09:20:05+5:302021-08-16T09:42:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांत लहान मुलांना कोरोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे

देशात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 3 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत कोरोनाने चार लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावतानाचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असलेली दिसत आहे.

देशातील अनेक राज्यांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनच्या चिंतेत भर टाकली आहे. या दरम्यान एक धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत लहान मुलांना कोरोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये गेल्या 10 दिवसांत 500 हून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली होती.

बंगळुरूनंतर आता ओडिशामध्ये 138 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता परत वाढली आहे. रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना आकडेवारी जारी केली आहे.

आकडेवारीनुसार, 1058 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 138 लहान मुलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाचा आकडा 9 लाख 94 हजार 565 पर्यंत पोहोचला आहे.

कोरोनामुळे मृतांची संख्या 6887 इतकी झाली आहे. रविवारी कोरोनामुळे 64 जणांचा मृत्यू झाला आहे. 616 रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 1.53 टक्क्यांवर पोहोचला आहे

राज्यातील खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 376 रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये 162, जाजपूरमध्ये 77 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे 27 जिल्ह्यात 100 हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत एकही करोना रुग्ण नाही.

खोर्धा जिल्ह्यात 16, कटकमध्ये 12, नयागरमध्ये 13 मृत्यूची नोंद झाली आहे. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना पाहायला मिळत आहे.

लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आधीच्या तुलनेत वाढली असल्याचं समोर आलं आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेतील अल्बामा, अरकंसास, लुसियाना आणि फ्लोरिडामध्ये 18 वर्षाखालील मुलांमधील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

अरकंसासमधील लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सात नवजात बालके अतिदक्षता विभागात असून दोन व्हेंटिलेटवर असल्याची माहिती मिळत आहे.

युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलचे बाल रोग तज्ज्ञ प्रा. एडम फिन्न यांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा आजार पहिल्या दोन लाटेच्या तुलनेने वेगळा असल्याचं म्हटलं आहे.

इम्पिरिअल कॉलेज लंडनमधील पीडियाट्रिक इन्फेक्सियश आजार तज्ज्ञ डॉ. एलिजाबेथ व्हिक्टर यांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 12 वर्षावरील मुलांमध्ये संसर्गाचा दर वाढला आहे. त्यातील बहुतांशी मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे मुलांच्या लसीकरणावर लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.

तज्ज्ञांनी लठ्ठ आणि मधुमेहानेग्रस्त असलेल्या मुलांसाठी हा काळ आव्हानात्मक आहे असं म्हटलं आहे. संसर्गाचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे. अमेरिकेतील मुलांमध्ये पीडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टी सिस्टम सिंड्रोमची (पीआयएनएस) प्रकरणे वाढली आहेत.