CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:38 AM2021-03-19T08:38:31+5:302021-03-19T08:58:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले असून नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 25 हजार 833 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 12 हजार 764 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.

राज्यातील आकडेवारी 25 हजारांच्या पार पोहोचली असताना मुंबईत कोरोनाची भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकट्या मुंबईत गेल्या 24 तासांत 2 हजार 877 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनाचे 917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 957 झाली आहे.

मध्य प्रदेशात सध्या 6 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात.

बसेसवर घालण्यात आलेली बंदी कधीपर्यंत असेल हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, असं मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 172 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल 101 दिवसांत ही मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (18 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,14,74,605 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,52,364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,10,63,025 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मार्चमध्ये आता नव्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे.

काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 82 टक्के नवीन केसेस या सहा राज्यांशी संबंधित आहेत.

Read in English