Joshimath Sinking News: भिंतींमधून पाणी झिरपतंय, रस्त्यांना मोठे तडे गेलेत; जोशीमठातील ‘त्या’ ५६१ घरांचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:54 AM2023-01-06T09:54:57+5:302023-01-06T09:59:56+5:30

Joshimath Sinking News: उत्तराखंडच्या जोशीमठ भागातील ५६१ घरे अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले जात आहे. नेमके कारण काय? जाणून घ्या...

दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर आता उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील जोशीमठचा भाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. या भागातील शेकडो घरे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या घरांमधील हजारो लोकांचे जीवन पणाला लागल्याची स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. (Joshimath Sinking News)

दिल्ली आणि एनसीआरच्या तुलनेत केवळ २ रिश्टर स्केलचा भूकंप जोशीमठ परिसरात झाला, तर या भागात हाहाकार माजू शकतो, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. जोशीमठ भागातील हजारो रहिवासी आपली घरे वाचवण्यासाठी आंदोलने करत आहेत. कॅंडल मार्च काढत आहेत आणि सरकार तसेच न्यायपालिकेला वैध असलेली घरे वाचवण्याचे आवाहनही करत आहेत.

जोशीमठ हे उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली असल्याचे म्हटले जाते आहे. जोशीमठमधील ९ हून अधिक भागातील ५६१ घरांना तडे गेले आहेत.

जोशीमठमधील सर्व नऊ वॉर्ड – परासारी, रविग्राम, सुनील, वरचा बाजार, नरसिंग मंदिर, मनोहर बाग, सिंहधर, मारवाडी आणि गांधी नगर – या भागात घरांमध्ये केवळ तडे गेलेले नाहीत, तर या भेगा रुंदावत आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचली असून अनेक ठिकाणी भिंतींमधून अचानक पाणी येत आहे.

भूस्खलन आणि तडे जाण्याच्या घटनांमुळे लोक भयभीत झाले आहेत. अनेकांना तर भीतीमुळे घरे सोडावी लागत आहेत. जोशीमठ-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मारवाडी परिसरात खड्ड्यांमधून अचानक पाणी वाहू लागले आहे. याशिवाय जोशीमठच्या मुख्य पोस्ट ऑफिसला तडे गेले असून, ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

ज्योतिर्मठ संकुल आणि लक्ष्मी नारायण मंदिराच्या आजूबाजूच्या इमारतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घरे रिकामी केली आहेत. प्रशासनाने काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. असे असतानाही या कडाक्याच्या थंडीत अनेकांना उघड्यावर राहावे लागत आहे.

प्रशासनाने १३० घरे निर्धारित केली आहेत ज्यात ७०० हून अधिक लोक राहतात. या भेगा इतक्या रुंद झाल्या आहेत की, कधीही मोठे भूस्खलन होईल, असा कयास बांधला जात आहे. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील भेगा वाढत असून, त्यातून भीतीदायक आवाज येत असल्याने लोक घाबरले आहेत.

आताच्या घडीला ५६१ घरांना तडे असल्याची परिस्थिती आहे. आतापर्यंत ३४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासह जेपी कंपनी कॉलनी रिकामी करण्यात आली आहे. स्थलांतरित झालेली ६६ कुटुंबे आहेत. ज्यांच्या घरांना मोठे तडे आहेत, अशा लोकांना आधी स्थलांतरित करण्यात येईल, असे सरकारने आधीच सांगितले होते.

जोशीमठच्या लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्या घरांना तडे जाण्याचे कारण एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचा बोगदा आहे. त्याच्या बांधकामावर बंदी घालण्याची मागणी लोक करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता जोशीमठमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे.