उद्धव ठाकरे 'या' ३ प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत?; शिंदे गटाचा थेट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:22 PM2022-07-25T16:22:06+5:302022-07-25T16:25:28+5:30

लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. शिवसैनिकांची भावना लोकांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री भेटले आहेत. परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहावं मग आम्ही कुठे नाही म्हणतो. परंतु उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यायला हवा असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांच्या अश्रूला किंमत मग गरीब लोकांच्या अश्रूला किंमत नाही का? आमची बांधिलकी सर्वसामान्य जनतेची आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांना हकालपट्टी करायची. बाळासाहेब एका कुटुंबाचे नाही. हा विचार महाराष्ट्राचा आहे. बाळासाहेब हे महाराष्ट्राचे आहेत असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

आतापर्यंत बंड स्वत:ला काही पाहिजे म्हणून होतं, परंतु आताचे बंड विचारांसाठी आहे. भाजपाशी युती बाळासाहेबांनी २५ वर्षापूर्वी केली आहे. २०१९ ला एकटे लढण्याची तयारी होती. परंतु युती झाली त्यामुळे उमेदवाराला मिळालेली मते शिवसेना-भाजपा मतदारांची आहे. कुणा एका पक्षाची नाहीत.

जनतेला युती पसंत आहे की तुमची आघाडी पसंत याचा निर्णय लोक घेतील. हिंदुत्वासोबत जायचा निर्णय एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी घेतला आहे. लोकांना खोटं सांगून दिशाभूल करणं आता तरी थांबवावं असंही केसरकरांनी सांगितले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे आमच्यासाठी सुखद धक्का होता. भाजपा कार्यकर्त्यांसाठीही धक्का होता. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटलांचं अर्धवट वाक्य फिरवलं गेले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले असं केसरकर म्हणाले.

आम्ही आजपर्यंत ३ प्रश्न विचारलं त्याची उत्तरे उद्धव ठाकरेंनी द्यायला हवीत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं का? मला मुख्यमंत्री बनण्यास काही रस नाही. तुम्ही मुख्यमंत्री राहा. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी तोडा, भाजपाशी नैसर्गिक युती करावी असं सांगितले होते का?

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत युतीची बोलणी झाली होती. परंतु १२ आमदारांच्या निलंबनानंतर हे बारगळलं. तुम्हाला युती करायची होती. राहुल शेवाळेंनी जे सांगितले ते खरे आहे ना याचं उत्तरही दिले नाही. राज्यातील जनतेसमोर सत्य येऊ द्या.

आम्हाला महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करायचा आहे. शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. लोकांना भडकवण्याचं काम करू नका. पक्षप्रमुखांना वारंवार सांगूनही त्यांनी ऐकलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला संपवतेय असं सांगितले तरीही काही केले नाही. त्यामुळे आमदारांनी हे पाऊल उचललं.

लोकांसमोर सत्य यायला हवं. जे कुणी चुकीची विधानं जनतेसमोर करत आहात. अडीच वर्षाचा फॉर्म्युला तुम्ही सांगता मग अडीच वर्षानंतर तुम्हाला पायउतार व्हावचं लागलं असतं. शिवसेना ही बाळासाहेबांनी तयार केली होती. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असणारी संघटना आहे.

राज्यातील जनतेच्या सेवेसाठी समाजकारण करणार की राजकारण करणार याचं उत्तर शोधायला हवं. जर युतीबाबत तुमचं बोलणं सुरू होतं मग मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी काय मागितलं? जर तुम्ही पुढाकार घेतला असता तर मुंबईत संघर्ष झाला नसता. मराठी माणसाच्या हातून मुंबईत जाणार नाही. राजकारण करू नका. दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.