1300 वर्षे जुन्या कबरीत मृतदेहांसोबत सापडला खजिना, वारी साम्राज्याशी संबंध...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:06 PM2022-09-22T21:06:22+5:302022-09-22T21:09:22+5:30

कबरीत सोन्याचे-चांदीचे दागिने, तांब्याची शस्त्रे, चाकू, कुऱ्हाडी, लोकरीचे कापड, लाकूड आणि चामड्याने बनवलेल्या अनेक प्रकारच्या प्राचीन वस्तू सापडल्या आहेत.

जगभरात विविध ठिकाणी अनेकदा इतिहासाशी संबंधित अशा गोष्टी सापडतात, ज्या पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशातही असेच काहीसे घडले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना राजधानी लिमापासून काही अंतरावर असलेल्या हुआर्मे टाउनजवळ वारी साम्राज्याची जुनी कबर सापडली आहे.

या कबरीमध्ये 7 जणांचे अवशेष असून, यातील एक अवशेष वारी साम्राज्यातील उच्चभ्रू वर्गातील एका लॉर्ड ऑफ हुआर्मेचा आहे. वारी संस्कृतीचे अस्तित्व इसवी सन 500 ते 1000 या काळात होते. पोलंडच्या वॉर्सा विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार, लॉर्ड ऑफ ह्युर्मे व्यतिरिक्त, इतर 6 अवशेषांबद्दल फारशी माहिती नाही.

यातील काही लोकांना नंतर येथे दफन करण्यात आले असावे, असे मानले जात आहे. सापडलेल्या अवशेषांमध्ये दोन पुरुष, दोन स्त्रिया आणि तीन किशोरवयीन आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मृतदेहांसोबत सोन्याचे-चांदीचे दागिने, तांब्याची शस्त्रे, चाकू, कुऱ्हाडी, लोकरीचे कापड, लाकूड आणि चामड्याने बनवलेल्या अनेक प्रकारच्या प्राचीन वस्तू सापडल्या आहेत.

वॉर्सा विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि या शोध प्रकल्पाचे नेतृत्व करणारे मिलोस गियर्स यांनी हे सांगितल्यानुसार, वारी साम्राज्यातील उच्चभ्रू वर्गातील माणसाचे अवशेष पहिल्यांदाच सापडले आहेत. मिओझ गियर्स यांच्या टीमने गेल्या फेब्रुवारीला समुद्रकिनारी असलेल्या ह्युर्मे टाउनजवळील वारी स्मशानभूमीत सर्वात नवीन कबरी शोधली होती.

यापूर्वी सापडलेली कबर आताच्या कबरीपासू थोड्याच अंतरावर आहे. 2012 मध्ये मिओझ गियर्स आणि त्याची पत्नी प्राका गियर्सने या कबरीचा शोध लावला होता. 2012 मध्ये सापडलेल्या कबरीतून तीन उच्चवर्गीय महिलांचे अवशेष सापडले, त्या वारीच्या राज्याच्या राण्या असल्याचा अंदाज आहे. त्या कबरीत तीन राण्यांसोबत इतर 58 लोकांचे अवशेष सापडले होते.

500 ते 1000 इसवी सनाच्या दरम्यान वारी साम्राज्यातील लोक पर्वत आणि समुद्राच्या भागात राहत होते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते भांडी आणि कपड्यांपर्यंतची त्यांची कलाकृती हे वारीतील लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. वारीचे लोक त्यांच्या परंपरेशी खूप जोडलेले होते. इतिहासकारांच्या मते, इसवी सन 1200 नंतर वारी साम्राज्याचा अंत झाला. संशोधकांना 1940 सालापासून हुआर्मे शहराजवळ कबरी सापडत आल्या आहेत.