तीन वर्षं नौदलात सेवा, हँडमेड बंदुकीने केला गोळीबार, शिंजो आबेंच्या मारेकऱ्याबाबत समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:10 PM2022-07-08T19:10:47+5:302022-07-08T19:18:49+5:30

Shinzo Abe News: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी एका व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबे यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी एका व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबे यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.

शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी ज्या व्यक्तीला पकडलं आहे त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेटसुयो यामागामी असं या व्यक्तीचं नाव असून, त्याने जपानच्या नौदलामध्ये सेवा दिलेली आहे.

जपानमधील नारो शहरामध्ये शिंजो आबे हे भाषण देत असताना टेटसुयो यामागामी याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यासाठी त्याने हँडमेड गनचा वापर केला.

जपानी वृत्तसंस्था एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार यामागामी याने २००५ पर्यंत तीन वर्षे जपानच्या सागरी आत्मरक्षा बलामध्ये काम केलं होतं. दरम्यान, आबे यांच्यावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्याला त्वरित पकडलं. आता त्याने हा हल्ला का केला याचा तपास केला जात आहे.

यामागामी याला ताब्यात घेतल्यानंतर त्वरित नारा निशी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच पोलिसांना हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली बंदूकही जप्त केली आहे.

दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर शिंजो आबे यांना अॅटॅक आला, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. अखेर काही तासांच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.