बलूच हल्ल्यांना पाकिस्तान-चीन घाबरले, घेतला मोठा निर्णय; पण कराचीतून 5 लाख लोकांना हलवावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:31 PM2021-10-10T18:31:43+5:302021-10-10T18:42:41+5:30

खरे तर, बलुचिस्तानातील ग्‍वादर बंदर हे चीनसाठी एक मोठे संकट बनले होते. येथे चीनी नागरिक आणि त्यांच्या गुंतवणुकीवर बलूच बंडखोर सातत्याने हल्ले करत होते.

पाकिस्तानातील अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतात, बलूच बंडखोरांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना घाबरून, चीन आणि पाकिस्तानने ग्वादर बंदराला चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे केंद्र बनविण्याची योजना सोडली आहे. चीनचा CPEC प्रकल्प हा त्यांच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा भाग आहे. (China-Pakistan ambitious plan CPEC now in Karachi)

चीन आणि पाकिस्तान यांच्यात आता कराची बंदर विकसित करण्यासंदर्भात नुकताच करार झाला आहे. कराची शहर हे सिंध प्रांताची राजधानी आणि पाकिस्तानातील आर्थिक कामकाजाचे केंद्र आहे.

जपानी वृत्तपत्र निक्‍केईने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने जारी केलेल्या माहितीनुसार या प्रकल्पावर चीन सुमारे साडेतीन अब्ज डॉलर्स एवढा खर्च करणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या प्रकल्पात कराची बंदराचा विस्तार, मासेमारीसाठी एका दुसऱ्या बंदराची निर्मिती आणि 640 हेक्टर भागात व्यापारी झोनच्या निर्मितीचा समावेश आहे. यामध्ये एक पूलदेखील बांधला जाईल, जो कराची बंदराला मानोरा बेटांशी जोडेल.

इम्रान म्हणाले 'गेमचेन्जर' निर्णय - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, कराचीचा समावेश CPEC मध्ये करण्याचा निर्णय 'गेम चेन्जर' असल्याचे म्हटले आहे. इम्रान यांनी ट्वीट करत म्हटले आहे, की 'या प्रकल्पामुळे आमच्या मच्छीमारांना समुद्राचा परिसर स्वच्छ करण्यास मदत मिळेल. एवढेच नाही, तर कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी 20 हजार घरे बांधली जातील. तसेच, गुंतवणूकदारांसाठीही संधी उपलब्ध होईल. यामुळे कराचीचा विकसित बंदर असलेल्या शहरांमध्ये समावेश होईल.

खरे तर, बलुचिस्तानातील ग्‍वादर बंदर हे चीनसाठी एक मोठे संकट बनले होते. येथे चीनी नागरिक आणि त्यांच्या गुंतवणुकीवर बलूच बंडखोर सातत्याने हल्ले करत होते. गेल्या ऑगस्‍ट महिन्यातही याच भागात एका चिनी वाहनाला निशाना बनवून आत्‍मघाती हल्ला करण्यात आला होता. यात दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते. ग्‍वादरच्या जवळपास गेल्या अनेक दिवसांपासून बलूच नागरिकांचा विरोध सुरू आहे.

सौदी अरेबियाही हलवत आहे आपला तेल शुद्धीकरण प्रकल्प - केवळ चीनच नाही, तर सौदी अरेबियाही आपला तेल शुद्धीकरण प्रकल्प ग्वादरमधून कराचीला हलवत आहे. सौदी अरेबिया 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून कराचीमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारत आहे. यामुळे पाकिस्तान सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण पाकिस्तान ग्वादरला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करू इच्छित होता. आता चीनही आपला प्रकल्प ग्वादरमधून कराचीला हलवत आहे. कराची बंदर हे पाकिस्तानचे सर्वात मोठे बंदर आहे.

वॉशिंग्टनमधील दक्षिण आशियाई विषयाचे तज्ज्ञ मलिक सिराज अकबर यांनी म्हटले आहे, की कराची हे केवळ उत्तम पायाभूत सुविधाच पुरवत नाही, तर येथील कायदा आणि सुव्यवस्थाही अत्यंत चांगली आहे, जे CPECसाठी एक उत्तम केंद्र आहे.

कराचीतून तब्बल 5 लाख लोकांना हलवावे लागणार - सिराज अकबर म्हणाले, सीपीईसी हे चीनच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक बनावे, अशी चीनची इच्छा आहे. मग ते कोणत्याही भागात का असेना. आता चीनने ग्वादारऐवजी कराचीचा विकास करण्याचा करार केला असला, तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत कठीण होणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मँग्रोव्ह नष्ट होईल. सुमारे 5 लाख लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागेल. एवढेच नाही, तर तज्ज्ञ सीपीईसी प्रकल्पाच्या भविष्‍यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत.