भारताची वाढली चिंता, भुतान बनलं बाहुलं; चीनचं कृत्य सॅटेलाईट इमेजमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:56 PM2023-12-12T13:56:29+5:302023-12-12T14:00:29+5:30

२०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी पश्चिमी भुतानच्या सिलिगुडी कॉरिडोर रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचे लोकेशन म्हणून पुढे आले होते. चीन गेल्या अनेक दशकांपासून या भागावार नजर ठेऊन आहे. तर गेल्या ५ वर्षात चीन आता भुतानच्या उत्तरी भागावरही लक्ष ठेवत आहे.

सॅटेलाईट इमेजमध्ये असा खुलासा झालाय की, चीन वेगाने भुतानच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करत असल्याचे दिसत आहे. चीनचे हे कृत्य भारतासाठी आगामी काळात धोक्याची घंटा होण्याचे मोठे कारण आहे.

भारतासाठी हे चिंताजनक आहे कारण जाकरलुंग खोरे येत्या काळात चीनच्या हाती जाऊ शकते. भुतानच्या कळत नकळत जाकरलुंग आणि शेजारील मेनचुमा खोऱ्यात चीनचा जवळपास कब्जाच झाला आहे. आता हा दिवसही दूर नाही जेव्हा भुतान हा भाग चीनच्या ताब्यात देईल.

भुतानच्या अनेक भागात चीन बांधकाम करत आहे. भुतानच्या बेयुल खोऱ्यातही चीननं रस्त्याचे जाळे विणायला सुरुवात केलीय. त्याचसोबत चीनी सैन्याच्या चौक्याही उभारल्या आहेत.

चीनने याआधीही भुतानच्या परिसरात रोड बनवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते पश्चिमी भुतानमध्ये सुरू होते. जेव्हा २०१७ मध्ये चीनने दक्षिण पश्चिमेकडील डोकलाम इथं रोड बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताने त्याला कडाडून विरोध केला. त्यावेळी भारतीय आणि चीनी सैन्यात संघर्ष झाला होता.

चीनसमोर भुतान गुडघे टेकताना दिसत आहे. जे भारतासाठी कुठल्याही रितीने चांगले संकेत नाही. चीनच्या या कारवायांवर भुतानला गप्प राहण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही कारण भुतान चीनसमोर स्वत:ला खूपच कमकुवत समजत आहे. त्यामुळे चीनची हिंमत वाढली असून तो भुतानमध्ये घुसखोरी करत आहे.

बेयुलशिवाय भुतानच्या मेनचुमा खोऱ्यातही चीनचे बांधकाम झाल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये काही दिवस या भागावर चीनने कब्जा केल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. बेयुल आणि मेनचुमा इथं चीनच्या लिबरेशन आर्मीच्या चौक्याही आहेत.

भुतानचे परराष्ट्र मंत्री टांडी दोर्जी यांनी बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही देशांमध्ये आपापल्या सीमा निर्धारित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तर शेजारील राष्ट्र भुतानचे पंतप्रधान लोते थेरिंग यांनी यावर्षाच्या सुरुवातीलाच डोकलाम वाद हा ३ देशांच्या सीमांमधील वाद असल्याचे म्हटलं होते. डोकलाम वाद भारत, चीन आणि भुतान या तिघांना एकत्र सोडवायला हवा कारण या वादात तिन्ही देश समान जबाबदार आणि भागीदार आहेत.