Cyber Warfare: सायबर हल्ल्यांसाठी चीनने सुरू केली तयारी, भारताला राहावे लागेल सतर्क...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:49 PM2022-04-13T19:49:31+5:302022-04-13T19:52:20+5:30

Cyber Warfare: भारतीय हवाई दलाचे प्रमुख विवेक राम चौधरी यांनी इशारा दिला आहे की, भविष्यातील युद्ध शस्त्रांनी नाही, तर तंत्रज्ञानाने होईल. यात आर्थिक हल्ला, इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट, काँप्यूटर व्हायरस आणि हायपरसोनिक मिसाइलसारख्या शस्त्रांचा वापर होईल.

पूर्वीपासून आतापर्यंत युद्ध शस्त्रांनी लढले जात आहे. पण, येणाऱ्या काळात युद्ध शस्त्रांनी नाही, तर तंत्रज्ञानाने लढले जाईल. सायबर वॉरफेअरमध्ये पारंगत असलेला देशच युद्ध जिंकेल, अशी प्रतिक्रिया भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दिली आहे. लढाईचे सर्वात मोठे शस्त्र लॅपटॉप असेल आणि एका लहान खोलीत बसलेला तरुण मोठ्या सैन्याचा पराभव करेल, असेही ते म्हणाले.

चौधरी यांनी म्हटले की, नवीन परिस्थितीत आपल्याला जुन्या पद्धतीने लढण्याची पद्धत बदलावी लागेल. नव्या पद्धतीने विचार करून नवीन शस्त्रे शोधावी लागतील. जग एका नेटवर्कमध्ये सामील होत आहे आणि एकच सायबर हल्ला आपली संपूर्ण कमांड नष्ट करू शकतो. भविष्यात आपल्यावर कोणी हल्ला केला किंवा आपला शत्रू कोण हेही आपल्याला कळणार नाही. भविष्यात संगणक व्हायरसपासून अल्ट्रासोनिक क्षेपणास्त्रांपर्यंत नवीन शस्त्रे आणि हल्ले लष्करी लढाईपासून माहिती ब्लॅकआउटपर्यंत असतील.

ते पुढे म्हणातात की, आता भारतीय सैन्य संगणक नेटवर्कवर आधारित प्रणाली वापरून माहितीची देवाणघेवाण करत आहे. यातून कमीत कमी वेळेत रणनीती बनवली जाते. अशा प्रकारचे नेटवर्क कामात वेग आणि अचूक माहिती मिळवण्याची संधी देतात. पण, ते सायबर हल्ल्यांचे सर्वात सोपे बळीदेखील आहेत. नवीन शस्त्रे माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहेत, त्यामुळेच यावर सायबर हल्ले करणे सोपे आहे.

21व्या शतकाच्या सुरुवातीला सायबर युद्धाची बहुतांश तयारी चीनने सुरू केली होती. चीनने वन मिलियन लॅपटॉप वॉरियरचा नारा देत तयारी सुरू केली. जगातील बहुतेक संगणक हार्डवेअर चीनमधून बनवले जातात आणि यामुळेच चीनला सायबर युद्धात पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. अनेक मोठ्या संगणक आणि माहितीशी संबंधित कंपन्यांवर चिनी लष्कराचे थेट नियंत्रण आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनेक शहरांमध्ये चिनी सैन्याने सायबर युद्धासाठी प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत, जिथे तरुणांना लॅपटॉप योद्धे बनवले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, 2000 च्या पहिल्या दशकात चीनने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा यासह अनेक देशांवर सायबर हल्ले केले. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, चीनच्या हॅकर आर्मीची संख्या पन्नास हजारांपासून ते एक लाख हॅकर्सपर्यंत आहे.

भारताने 2019 मध्ये सायबर युद्धासाठी संरक्षण सायबर एजन्सी (DCA) ची पायाभरणी केली, जी 2021 मध्ये कार्यरत झाली. सायबर हल्ल्यांना सामोरे जाणे, सायबर हल्ल्यांचा सामना करणे आणि भविष्यासाठी सायबर रणनीती विकसित करणे ही DCA ची जबाबदारी आहे. तसेच, भारतीय सैन्याला भविष्यातील लढाईसाठी खूप वेगाने तयारी करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.