'इस्रायलला मान्यता नाही; प्रवासावर प्रतिबंध कायम'; पासपोर्ट प्रकरणी बांगलादेशचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:59 AM2021-05-24T10:59:20+5:302021-05-24T11:09:15+5:30

Bangladesh On Israel : इस्रायलबाबत आपल्या धोरणांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण बांगलादेश सरकारनं दिलं आहे.

अनेक देशांनी इस्रायल या देशाला मान्यता दिली आहे. परंतु असेही अनेक देश आहेत ज्यांनी इस्रायलला देश म्हणून अद्यापही मान्यता दिलेली नाही. त्यापैकीच एक देश म्हणजे बांगलादेश.

बांगलादेशच्या पासपोर्टवर एक वाक्य लिहिलेलं असतं. हा पासपोर्ट इस्रायल सोडून जगातील सर्व देशांमध्ये मान्य आहे. परंतु बांगलादेश सरकारनं २२ मे रोजी आपल्या पासपोर्टवरून हे वाक्य हटवण्याची घोषणा केली होती.

बांगलादेश सरकारचं हे पाऊल इस्रायलकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. तसंच इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानंदेखील याचं स्वागत करत नवे संबंध प्रस्तापिथ करण्याबाबतही म्हटलं होतं.

परंतु बांगलादेशनं आता पुन्हा यावर स्पष्टीकरण देत इस्रायलबाबत त्यांच्या धोरणांमध्ये आणि त्यांच्या दृष्टीकोनात कोणताही बदल झाला नाही असं म्हटलं आहे.

इस्रायलला बांगलादेश मान्यता देत नाही आणि प्रवासावर प्रतिबंध कायम राहतील असं बांगलादेशनं म्हटलं आहे. आम्ही बांगलादेशच्या पासपोर्टवरून ते वाक्य हटवण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता जेव्हा आम्ही ई-पासपोर्ट लाँच केला होता अशी माहिती बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमेन यांनी रविवारी दिली.

हे उचललेलं पाऊल आमच्या पासपोर्टच्या मानकीकरणासाठी आहे असं बांगलादेशनं स्पष्ट केलं. इस्रायलबाबत आमचं परराष्ट्र धोरण पूर्वीप्रमाणेच असेल. आम्ही इस्रायलसोबत नवे संबंध प्रस्थापित करण्यास जाणार नाही, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं.

आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांचं समर्थन करत राहू आणि टू स्टेट सोल्यूशनचंही समर्थन करत राहू. परंतु आमच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल होणार नाही, असं मोमेन यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रायलानंदेखील निवेदन जारी करत इस्रायलबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमचं लक्ष इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या ट्वीटकडे गेलं. ज्यामध्ये आता जारी करण्यात येत असलेल्या ई-पासपोर्टमध्ये इस्रायलच्या प्रवासावर प्रतिबंध हटवण्याचं स्वागत करण्यात आलं होतं.

आंतरराष्ट्रीय मानकं पूर्ण करण्यासाठी आम्ही ई-पासपोर्टमध्ये हा बदल केला आहे. मध्य-पूर्व भागाबाबत आमच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.

बांगलादेशी पासपोर्टधारकांसाठी इस्रायलच्या प्रवासावर प्रतिबंध कायम असतील. आम्ही आमच्या जुन्या धोरणांवर कायम आहोत, असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. याशिवाय बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं अल अक्सा मशिद परिसर आणि गाझामध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

द डेली जुगांतरचे ज्येष्ठ पत्रकरार मसूद करीम यांनी याबाबत बोलताना हा तांत्रिक मुद्दा असल्याचं म्हटलं. तसंच इस्रायल सोबत संबंध प्रस्थापिक करण्यामध्ये बांगलादेशची कोणतीही राजकीय इच्छा नसल्याचंही ते म्हणाले.

हे परराष्ट्र धोरण नाही, गृह मंत्रालयाचा एक प्रशासनिक निर्णय आहे. जर हा परराष्ट्र धोरणाचा भाग असता तर गृह मंत्रालयानं परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा केली असती. परंतु दोन्ही विभागांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले.

बांगलादेशच्या पासपोर्टवर यापूर्वी एक अट लिहिण्यात येत होती. यामध्ये हा पासपोर्ट इस्रायल सोडून जगातील अन्य देशांमध्ये प्रवासासाठी मान्य आहे, असं त्यावर लिहिण्यात आलं होतं. परंतु शनिवारी त्यावरील ते वाक्य हटवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

हे वाक्य हटवण्याच्या निर्णयानंतर इस्त्रायली परराष्ट्र मंत्रालयामध्ये आशिया आणि पॅसिफिकचे उप-महासंचालक गिलाद कोहेन यांनी ट्वीट केलं होतं. तसंच बांगलादेशनं इस्रायलबाबत प्रवासाचे निर्बंध हटवल्याचं म्हटलं होतं.

ही एक चांगली बातमी आहे. बांगलादेशनं इस्रायलसाठी असलेले प्रवासाचे प्रतिबंध हटवले आहेत. त्यांनी उचललेलं हे स्वागतार्ह पाऊल आहे, असंही ते म्हणाले होतं.