…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 07:21 AM2020-08-30T07:21:01+5:302020-08-30T07:42:41+5:30

चीनमधील दहा मोठ्या शहरांमधील लोकांनी सध्याच्या विवादाबाबतची आपली भूमिका एका सर्वेमधून मांडली आहे.

लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे लष्कर सीमेवर तैनात असून, दोन्ही देशातील नागरिकही तीव्र भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान, चीनमधील दहा मोठ्या शहरांमधील लोकांनी सध्याच्या विवादाबाबतची आपली भूमिका एका सर्वेमधून मांडली आहे.

या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या सुमारे ५० टक्के चिनी लोकांनी भारत हा चीनवर आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचा दावा केला. तर केवळ २७ टक्के लोकांनी असे नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, दोन्ही देशांत युद्ध झाल्यास भारतीय लष्कर हे चीनसाठी धोकादायक ठरू शकते, असे मत एक तृतियांशहून अधिक लोकांनी व्यक्त केले. तर ५७ टक्के चिनी नागरिकांना भारतीय सैन्यापासून आपल्याला धोका आहे, असे वाटत नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत उदभवलेल्या विवादानंतर भारतामध्ये चीनविरोधात प्रमाणापेक्षा अधिक तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत, असे मत ७१ टक्के चिन्यांनी व्यक्त केले. तर १५ टक्के चिनी नागरिकांना ही बाब योग्य वाटते.

दरम्यान, भारताने चिनी उत्पादनांवर घातलेल्या बहिष्काराबाबत ३५ टक्के चिनी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर ३० टक्के चिनी नागरिकांना या बहिष्काराबाबत भारतच तितकासा गंभीर नसल्याचे वाटतेय. तसेच भारताच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यात यावे, असे त्यांचे मत आहे.

भारत आणि चीनमधील सीमा विवाद हाच दोन्ही देशांत असलेल्या संबंधामधील अडथळा आहे, असे ३० टक्के चिनी नागरिकांचे मत आहे. तर भारताने अमेरिकेच्या नादी लागून चीनशी पंगा घेतला आहे. एक ततुर्थांश लोकांचे मत आहे.

भारत आणि चीनमध्ये पुन्हा सीमावाद निर्माण झाला तर चिनी सैन्याने भारताविरोधात लष्करी कारवाई करावी, असे ९० टक्के चिनी जनतेचे मत आहे. तर केवळ ७ टक्क्यांच्या आसपास लोक चिनविरोधात बलप्रयोग करण्याच्या विरोधात आहेत.

दरम्यान, भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये चढउतार येतच राहतील असे, २५ टक्के चिनी लोकांना वाटते. तर दोन्ही देशातील संबंधांमध्ये दीर्घकाळानंतर सुधारणा होईल, असे २५ टक्के लोकांना वाटते. तर २० टक्के लोकांना दोन्ही देशातील संबंध एवढ्यात सुधारतील, असं वाटत नाही.

Read in English