Weight loss Tips: वाढत्या वजनामुळे हैराण? दही खा आणि काही आठवड्यात वजनात घट झालेली बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:00 AM2022-07-22T07:00:00+5:302022-07-22T07:00:01+5:30

Weight loss Tips: आजकाल बहुतेक लोक वाढते वजन आणि लठ्ठपणाशी निगडित आजारांमुळे त्रस्त आहेत. तुम्हीसुद्धा त्यांच्यापैकी एक असाल तर तुम्ही दही खाण्याचे फायदे जाणून घेतले पाहिजेत. योग्य रीतीने योग्य प्रमाणात दही खाल्ले असता तुम्ही नैसर्गिक रित्या वजनात घट झालेली अनुभवू शकता. त्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात दह्याचे प्रमाण किती व कसे असायला हवे ते जाणून घ्या!

लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन कमी करणे हे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. सद्यस्थितीत बदलत्या जीवन शैलीमुळे १० पैकी ६ लोक वजन वाढीमुळे त्रस्त आहेत. व्यायाम, डाएट, योगाभ्यास, औषधं असे सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही वजन कमी झाले नाही की अपयशाची भावना निर्माण होते आणि त्या नैराश्यात पुन्हा वजन दुपटीने वाढते. हे दुष्ट चक्र भेदायचे असेल तर इथे दिलेला उपाय आजमावून बघा.

'दही नाही तर काही नाही' असे वाक्य आपल्या आजी पणजीच्या तोंडी रुळलेले असे. कारण पूर्वी दही, लोणी, तूप घरच्या घरी बनवले जात असे. त्याचा वापर रोजच्या आहारात नियमितपणे केला जात असे. मात्र, अलीकडे विकतचे दही आणले जाते. त्या दह्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. म्हणून आयुर्वेद सांगते, घरी लावलेल्या देहाचेच सेवन करावे.

दही फॅट बर्नर म्हणून काम करते. दह्यात प्रोबायोटिक्स असतात. जे पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि त्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. जेव्हा चयापचय क्रिया सुरळीत होते तेव्हा वजन वेगाने कमी होते. दह्यामध्ये प्रोटीन देखील असते, यामुळे पोट लवकर भरते आणि बराच काळ तग धरता येते. त्यासाठी दह्याचे सेवन पुढील प्रकारे करा.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात घरी विरजलेल्या साध्या दह्याचा समावेश करू शकता. मात्र दह्याचे सेवन सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात करावा. सूर्यास्तानंतर दही खाऊ नये. दही खाताना त्यात मीठ, साखर न घालता साधे दही खावे. तसे आवडत नसल्यास दह्यात कांदा, टोमॅटो, काकडी टाकून कोशिंबीर करून खावी. रोज दही खाण्याने तुम्हाला वजनामध्ये मध्ये होणारे बदल हळू हळू जाणवू लागतील.

दही अधिक आरोग्यदायी बनवायचे असेल तर त्यात सुकामेवा घालावा. जसा आपण लस्सीमध्ये घालतो. परंतु लस्सी मध्ये साखरेचा समावेश असल्याने ती रुचकर लागते. मात्र अधामोळे दही गोडसर असते. म्हणून घरी विरजलेले दही खावे असे म्हटले आहे. दह्यामध्ये सुका मेवा टाकल्याने ते अधिक पौष्टिक बनेल आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व त्यातून मिळू शकतील. हे मिश्रण खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहील आणि वजन कमी होईल.

जर तुम्हाला साधे दही आवडत नसेल तर तुम्ही काळी मिरी पावडर टाकून दही खाऊ शकता. यासाठी तुम्ही एक वाटी दही घ्या. त्यात काळी मिरी पावडर टाका व सेवन करा. दही आणि काळी मिरी हे दोन्ही घटक चयापचय प्रक्रियेला चालना देणारे आहेत. त्याचे मिश्रण शरीराला खूप लाभदायक ठरू शकते.