Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 08:34 AM2024-05-15T08:34:51+5:302024-05-15T09:08:48+5:30

Investment Tips Post Office : आरडी आणि एसआयपी हा कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पाहूया आरडीच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कम जमा करू शकता.

Investment Tips Post Office : जर तुम्ही एकरकमी मोठ्या रकमेची गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही कमी रकमेची बचत करूनही चांगली रक्कम जोडू शकता. आरडी आणि एसआयपी हा कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम असली तरी त्यातून गॅरंटीड परतावा मिळत नाही.

परंतु आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट ही खात्रीशीर परतावा देणारी योजना आहे. या योजना बँका तसंच पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या आरडीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीवरील चांगल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकता.

तुम्हाला बँकांमध्ये वेगवेगळ्या मुदतीत आरडी मिळतील, पण पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांसाठीच्या आरडीचा पर्याय मिळेल. सध्या पोस्ट ऑफिसआरडीवर ६.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. यामध्ये तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुम्ही २०००, ३००० किंवा ५००० रुपयांची आरडी सुरू केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला किती परतावा मिळेल? जाणून घेऊ.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये महिन्याला २००० रुपये गुंतवले तर ५ वर्षात तुम्ही एकूण १,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ६.७ टक्के दरानं तुम्हाला २२,७३२ रुपये व्याज आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला १,४२,७३२ रुपयांचं व्याज मिळेल.

महिन्याला ३००० रुपये गुंतवल्यास ५ वर्षात एकूण १,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ६.७ टक्के दरानं तुम्हाला ३४,०९७ रुपये व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी २,१४,०९७ रुपये मिळतील.

दरमहा आरडीमध्ये ५००० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही ५ वर्षात एकूण ३,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ६.७ टक्के दरानं तुम्हाला ५६,८३० रुपये व्याज आणि ३,५६,८३० रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

तुम्ही १०० रुपयांतदेखील खातं उघडू शकता, जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. चक्रवाढ व्याजामुळे ५ वर्षात चांगला नफा मिळतो. एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. संयुक्त खात्याची सुविधाही उपलब्ध आहे. यावर मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा आहे, परंतु, ३ वर्षानंतर प्री-मॅच्युअर क्लोजर केलं जाऊ शकतं.