NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 08:56 AM2024-05-13T08:56:11+5:302024-05-13T09:02:26+5:30

रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्वाचं आहेच आणि त्यासाठी उत्तम साधन म्हणजे एनपीएस. मोठी रक्कम मिळवण्यासाठी पाहूया यामध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागणार आहे.

आजकाल बहुतांश लोक गुंतवणूकीकडे वळू लागलेत. भविष्याच्या दृष्टीनं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करणंगी आवश्यक आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग Retirement Planning) खूप महत्वाचं आहेच आणि त्यासाठी उत्तम साधन म्हणजे एनपीएस (NPS).

निवृत्तीचं नियोजन करताना उलट कॅलक्युलेशन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला किती पैसे गुंतवायचे आहेत हे पाहावं लागत नाही, तर निवृत्तीनंतर तुम्हाला किती पैशांची गरज भासेल, याचा विचार करावा लागतो. आजच्या काळात मेट्रो शहरांचा विचार केला तर तिथे चांगलं आयुष्य जगण्यासाठी दरमहा सुमारे ५० हजार रुपयांची गरज भासते. यात तुमचं घरभाडे, गाडीचा खर्च, तुमचं खाणे-पिणं आणि प्रवास यांचा समावेश आहे.

आता जर तुमचे वय आज ३० वर्षे असेल आणि ३० वर्षांनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला काहीही न करता आरामाचं आयुष्य जगायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला आजपेक्षा ३-४ पट जास्त पैशांची गरज भासणार आहे. म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा सुमारे २ लाख रुपयांची गरज भासणार आहे. निवृत्तीनंतर दरमहा दोन लाख रुपये पेन्शन मिळावी यासाठी किती पैसे गुंतवावेत, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.

जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतील. एकतर तुम्ही तुमचे सर्व पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन घेण्यास सुरुवात करा किंवा ६० टक्के रक्कम काढून उरलेल्या ४० टक्के रकमेतून अॅन्युइटी प्लॅन तयार करा.

निवृत्तीनंतर एनपीएसच्या किमान ४० टक्के रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवावी लागते. आपण आपली संपूर्ण रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून त्यावर पेन्शन मिळवाल असं आम्ही गृहित धरत आहोत. अशा परिस्थितीत तुम्हाला किती कॉर्पसची गरज भासणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला दरमहा किती पैसे गुंतवावे लागतील हे जाणून घेऊया.

सध्याचा एफडीचा दर पाहिला तर तो ६-७ टक्क्यांच्या जवळपास आहे. आपण असे गृहीत धरू की जेव्हा आपण निवृत्त व्हाल तेव्हा आपल्याला कमीतकमी ५% व्याज मिळेल आणि जर आपल्याला जास्त व्याज मिळालं तर आपल्याला अधिक फायदा होईल. अशा तऱ्हेनं जर तुम्हाला दरमहा २ लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला वार्षिक २४ लाख रुपयांच्या व्याजाची गरज भासणार आहे. जर तुम्हाला ५ टक्के दराने २४ लाख रुपयांचे व्याज हवं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सुमारे ५ कोटी रुपयांचा कॉर्पस असावा लागेल. यामुळे तुम्हाला वार्षिक ५ टक्के दराने सुमारे २५ लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे.

जर तुमचे वय आता ३० वर्षे असेल आणि निवृत्तीनंतर ५ कोटी रुपयांचा निधी उभारायचा असेल तर आधी तुम्हाला किती व्याज मिळू शकते हे समजून घ्यावं लागेल. एनपीएसवर सरासरी १० टक्के व्याज सहज मिळतं. त्यामुळे जर तुम्ही दरमहा एनपीएसमध्ये सुमारे २२,१५० रुपये गुंतवले तर ३० वर्षांत तुमच्याकडे वार्षिक १० टक्के व्याजानं सुमारे ५ कोटी रुपये जमतील. कंपाउंडिंगमुळे हे शक्य होऊ शकतं या ३० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ७९.७४ लाख रुपये असेल. तर तुम्हाला जवळपास ४.२१ कोटी रुपयांचं व्याज मिळणार आहे.