शुक्राचा कन्या प्रवेश: ७ राशींना बोनस, दिवाळीत धनलक्ष्मी कृपा; लाभच लाभ, २६ दिवस समृद्ध काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 07:07 AM2023-11-03T07:07:07+5:302023-11-03T07:07:07+5:30

शुक्राच्या कन्या राशीतील प्रवेशाने बुधची विशेष योग जुळून येत असून, दिवाळीचा काळ काही राशींना वरदानासारखा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, अनेक ग्रह गोचर करणार आहेत. पैकी शुक्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करत आहे. ०३ नोव्हेंबर रोजी शुक्र कन्या राशीत विराजमान होणार असून, २९ नोव्हेंबरपर्यंत शुक्र कन्या राशीत असणार आहे. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात शुक्र दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्राच्या कन्या प्रवेशामुळे दिवाळीचा काळ काही राशींना अतिशय उत्तम लाभदायक, धन-धान्य वृद्धी, सुख-समृद्धीचा जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे यामुळे बुध आणि शुक्राचा एक शुभ संयोग जुळून येत आहे. कन्या ही बुधाचे स्वामित्व असलेली रास असून, शुक्राने कन्या राशीत गोचर केले आहे. याचवेळी बुध तूळ राशीत विराजमान आहे आणि तूळ ही शुक्राचे स्वामित्व असलेली रास आहे. हा एक वेगळा योगायोग घडला असून, दोन्ही शुभ ग्रहांमुळे याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या दोन शुभ ग्रहांचे एकमेकांच्या राशीत गोचर करणे उत्तम मानले गेले आहे. दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल आणि शुक्र-चंद्राचा योग हा ७ राशींना अतिशय फायदेशीर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

मेष: कामाच्या ठिकाणी खूप सावध राहण्याची गरज आहे. विरोधकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विरोधक तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू शकतात. भागीदारीमध्ये व्यवसाय करतात, त्यांनी भागीदाराशी कोणताही वाद घालण्याची गरज नाही. आवश्यकता नसेल तर शक्यतो प्रवास टाळावेत.

वृषभ: चांगला मानसन्मान मिळेल. वैयक्तिक जीवनात आनंद आणेल. मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅनही करू शकता. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. दुसरीकडे, सरकारी नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेला बसत असेल तर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: आर्थिक लाभ होईल. स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ असणार आहे. आर्थिक आघाडीवर फायदे होऊ शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात आणि शांततेत व्यतीत होईल. समाजात खूप मान-सन्मान मिळेल.

कर्क: खूप अनकूल काळ असू शकेल. मान-सन्मानात वाढ होईल. लोकप्रियता जास्त असणार आहे. आर्थिक दृष्टीकोनातून शुक्राचे गोचर खूप शुभ ठरणार आहे. विविध मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. खूप कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

सिंह: मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. दिलासादायक आणि तणावमुक्त वाटेल. कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडले असेल, तर या काळात तब्येतीत सुधारणा होऊ शकते. लक्झरी जीवनशैलीवर काही पैसे खर्च करू शकता. कोणतीही वस्तू खरेदी करताना काळजी घ्या.

कन्या: शुक्राचे या राशीत होत असलेले गोचर अत्यंत शुभफल, परिणाम देणारे सिद्ध होईल. अविवाहित लोकांसाठी विवाहासाठी चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हे गोचर खूप चांगले असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना काही चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील.

तूळ: अनेक बाबतीत यश मिळू शकेल. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर, प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. मात्र, मन एकाग्र ठेवावे लागेल. आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर हा काळ शुभ राहील.

वृश्चिक: जीवनात आनंद येऊ शकेल. मेहनतीच्या जोरावर आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे.

धनु: आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तळलेले पदार्थ खाऊ नका. करिअरमध्येही अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चांगले संबंध असल्याचा फायदा मिळू शकतो.

मकर: उत्पन्न वाढ होऊ शकेल. कमाईचा मोठा भाग खरेदीवर खर्च करू शकतात. आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होईल. कोणतीही खरेदी बजेट तयार केल्यानंतरच करा. नोकरी बदलण्याचा विचार करणार्‍या नोकरदारांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. अनेकांचा धर्माकडे कल वाढेल.

कुंभ: शुक्राचे गोचर चांगले सिद्ध होणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत दिसेल. काही काळापासून पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर आगामी काळात दिलासा मिळू शकतो. मात्र, वेळोवेळी नकारात्मक विचारांना सामोरे जावे लागू शकते. अशा विचारांपासून लांब राहिले पाहिजे. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मीन: एखादा निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत भांडणे वाढू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.