नवी TATA Nexon सिंगल चार्जमध्ये धावणार ४३७ किमी, मिळणार हे फीचर्स आणि किंमतही इतकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 02:16 PM2022-09-03T14:16:57+5:302022-09-03T14:24:13+5:30

टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही जेट एडिशन देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. अलीकडेच, कंपनीने हॅरियर आणि सफारीचे जेट एडिशन लाँच केले होते.

टाटा मोटर्सने (Tata Motors) नेक्सॉन ईव्ही (Nexon EV Jet) जेट एडिशन देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. अलीकडेच, कंपनीने हॅरियर आणि सफारीचे जेट एडिशन लाँच केले होते. आता नेक्सॉनची जेट एडिशनही बाजारात आली आहे. कंपनीने याला Nexon EV Prime आणि Nexon EV Max या दोन प्रकारात लाँच केले आहे. टाटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी मोठ्या बॅटरी पॅकसह Nexon EV Max देखील सादर केली होती.

टाटा मोटर्सच्या नव्या Nexon EV जेटची सुरुवातीची किंमत 17.50 लाख रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. XZ+ लक्स प्राइम जेटची किंमत रु. 17.50 लाख, XZ+ लक्स मॅक्स जेटची किंमत रु. 19.54 लाख आणि रेंज-टॉपिंग मॉडेलची किंमत रु. 20.04 लाख आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. Nexon EV हे भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांपैकी एक आहे.

2022 टाटा नेक्सॉन ईव्ही जेट एडिशनचे डिझाइन आणि लूक यापूर्वी लाँच केलेल्या जेट एडिशनसारखेच आहे. कंपनीने नेक्सॉन ईव्ही जेट स्टारलाईट रंगात आणली आहे. यामध्ये अर्थी ब्रॉन्झ, प्लॅटिनम सिल्व्हर रूफचा ड्युअल टोन मिळेल. तसेच, नवीन नेक्सॉन जेट एडिशनमध्ये 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतील.

टाटा नेक्सॉन ईव्ही जेट एडिशन EV Max 40.5 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येते. हे 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीचा दावा आहे की ही कार सिंगल चार्जमध्ये 437 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. तसेच केवळ 9 सेकंदात 0 ते 100 किमी पर्यंतचा वेग पकडू शकते असंही कंपनीचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे, Nexon EV प्राइम सिंगल चार्जवर 312 किमी प्रवास करू शकते. 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी या कारला 9.9 सेकंदांचा कालावधी लागतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात इलेक्ट्रीक सनरूफ, मल्टी-मोड रिजन, ज्वेल कंट्रोल नॉब, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस मोबाइल चार्जर यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

Tata Nexon EV च्या जेट एडिशनचे केबिन पियानो ब्लॅक फिनिश थीमसह येते. मेकॅनिकल रूपात ते पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. Nexon EV Jet Edition मध्ये डॅशबोर्ड आणि डोअर पॅनल्सवर ब्रॉन्झ ट्रिम पाहायला मिळेल. दुसरीकडे, लेदर डोअर पॅडला नव्या ग्रॅनाइट ब्लॅक कलरमध्ये ठेवण्यात आले आहे.

विक्रीची आकडेवारी पाहिली तर ऑगस्ट 2022 मध्ये टाटा मोटर्सने 3,845 इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत यात घट झाली आहे. जुलैमध्ये टाटा मोटर्सने एकूण 4,022 इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रीक वाहन पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन ईव्ही प्राईम, नेक्सॉन ईव्ही मॅक्स आणि टिगोर ईव्ही यांचा समावेश आहे.