परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड : वरपूडकर-बोर्डीकरांच्या अस्तित्वाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:03 AM2018-05-15T00:03:32+5:302018-05-15T00:03:32+5:30

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांच्या समोरासमोर आले असून, मंगळवारी त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा होणार आहे़ दिग्गज नेते मंडळींचा या प्रक्रियेत सहभाग असल्याने परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे या घटनेकडे लक्ष लागले आहे़

Today's selection of president of Parbhani district bank: Examination of Verapudkar-Bordeer's existence | परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड : वरपूडकर-बोर्डीकरांच्या अस्तित्वाची परीक्षा

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड : वरपूडकर-बोर्डीकरांच्या अस्तित्वाची परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांच्या समोरासमोर आले असून, मंगळवारी त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा होणार आहे़ दिग्गज नेते मंडळींचा या प्रक्रियेत सहभाग असल्याने परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे या घटनेकडे लक्ष लागले आहे़
परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची १५ मे रोजी निवड होणार आहे़ या संदर्भातील निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधकांनी न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता़ तीन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी असलेल्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत मोठे बदल घडले आहेत़ जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर हे एकाच पॅनलमधून निवडून आले होते़
कालांतराने वरपूडकर यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर बोर्डीकर यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे़ ही निवडणूक पक्षविरहित होत असली तरी दोन्ही नेत्यांच्या अस्तित्वाची परीक्षा घेणारी ठरली आहे़ वरपूडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, कळमनुरीचे काँग्रेसचे आ़ डॉ़ संतोष टारफे, वसमतचे माजी आ़ जयप्रकाश दांडेगावकर यांचे समर्थन आहे़
तर बोर्डीकर यांना हिंगोलीचे भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे, हिंगोलीचे माजी आ़ साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे समर्थन आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डीकर यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व असून, ही बँक ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी यावेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांचे नाव पुढे केले आहे़ वरपूडकर गटाकडून स्वत: सुरेश वरपूडकर हेच या पदासाठी उत्सुक आहेत़ त्यामुळे वरपूडकर विरूद्ध जामकर अशी अध्यक्षपदाची लढत होणार आहे़ बँकेचे एकूण २१ संचालक असून, माजी आ़ कुंडलिकराव नागरे यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे़ तर आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या सदस्यत्वा संदर्भात न्यायालयाचा निर्णय झाला नसल्याने त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही़
तसेच माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांना परभणीत प्रवेशास बंदी असल्याने त्यांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही़ त्यामुळे १८ सदस्यांमध्ये ही निवडणूक होत आहे़ या १८ सदस्यांपैकी १० सदस्य वरपूडकर गटाकडे असल्याचे तर ८ सदस्य बोर्डीकर गटाकडे असल्याचे सोमवारी सायंकाळपर्यंत सांगितले जात होते़ बोर्डीकर यांच्या पॅनलमधूनच निवडून आलेले त्यांचे एकेकाळचे कट्टर एक संचालक वरपूडकर यांच्या गटात गेले असून ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बाहेरगावी गेले असल्याचे समजते़ त्यामुळे त्यामुळे ८ सदस्य संख्येवरून बोर्डीकर यांचा आकडा पुढे सरकत नसल्याने त्यांच्या गटासमोर अडचणी वाढल्या असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे़
वरपूडकर यांच्याकडे मात्र दहा सदस्य असून, त्यांच्याच बळावर आपण अध्यक्ष होऊ, असा त्यांचा अंदाज आहे़ दोन्ही गटांकडून अध्यक्षपदासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे़ बोर्डीकर गटाकडून याबाबत जिंतुरातून सूत्रे हलविली जात असून, वरपूडकर हे मात्र स्वत:च विविध संचालकांच्या गाठीभेटी घेत असल्याचे समजते़ त्यात बोर्डीकर यांच्या राजकीय विरोधकांकडून वरपूडकर यांना पुरेपूर मदत केली जात असल्याचेही चित्र आहे़
मंगळवारी सकाळी ११़४५ पासून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार असून, दुपारी १़२० वाजता याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे़
वरपूडकर यांचा अर्ज रद्द करण्याच्या हालचाली
सुरेश वरपूडकर हे स्वत:च अध्यक्षपदाचे उमेदवार असून, त्यांना या पदापासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांकडून वरिष्ठ स्तरावरून सोमवारी हालचाली करण्यात येत असल्याची चर्चा होती़ वरपूडकर यांच्याकडे कारखान्याची थकबाकी असल्यावरून त्यांचा अर्जच रद्द करता येतो का, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे समजते़ यासाठी भाजपाचे हिंगोलीचे आ़ तान्हाजी मुटकुळे व रामप्रसाद बोर्डीकर यांनी पुढाकार घेतल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती़ या संदर्भात प्रतिक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासकीय पातळीवरून नवीन कोणत्याही घडामोडी घडलेल्या नाहीत़ कोणालाही नोटीस काढलेली नाही़ मंगळवारी घोषित केल्याप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम होईल, असे सांगितले़

Web Title: Today's selection of president of Parbhani district bank: Examination of Verapudkar-Bordeer's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.