परभणी ; सहा तासांत आणखी दोन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:55 PM2018-12-28T23:55:40+5:302018-12-28T23:55:53+5:30

दुचाकीस्वारास अडवून चाकूहल्ला करीत वाटमारी केल्याच्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना सहा तासांत चारठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी दोन पथके स्थापन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी दिली.

Parbhani; Two more accused in six hours | परभणी ; सहा तासांत आणखी दोन आरोपी जेरबंद

परभणी ; सहा तासांत आणखी दोन आरोपी जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी) : दुचाकीस्वारास अडवून चाकूहल्ला करीत वाटमारी केल्याच्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना सहा तासांत चारठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी दोन पथके स्थापन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी दिली.
सेलू तालुक्यातील नागठाणा पाटी ते सेलू दरम्यान २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ६ ते ७ जणांनी वाटमारी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दुचाकीस्वार गोविंद श्रीमंत मोगल यांच्यावर चाकूहल्ला करुन चोरट्यांनी त्यांच्याजवळील पैसे, मोबाईल काढून घेतला होता. यातील एका चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला होता. अन्य सहा आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी सुनील पवार याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार दुचाकीवरुन सेलूकडे गेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. तेव्हा आरोपी पाथरीकडे गेल्याचा सुगावा लागला. त्यानुसार पोलीस पथक रवाना झाले. त्यात पाथरी रोडवरील बोरगाव शिवारात दुचाकीवर असलेल्या दोन साथीदारांना आरोपी सुनील पवार याने ओळखले. पोलिसांची गाडी त्यांच्याजवळ थांबताच या आरोपींनी दुचाकी सोडून उसाच्या शेतात पळ काढला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, सपोनि.अजयकुमार पांडे, स्थागुशाचे सपोनि.गोपीनवार यांनी पाठलाग करुन दोन्ही आरोपींच्या गुरुवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. चौकशीअंती आरोपींची नावे हरिश सुभाष पवार (रा.चारठाणा), रवि रामचंद्र पवार (रा.खुराणपूर ता.लोणार) अशी असल्याची स्पष्ट झाले. या आरोपींनी साथीदारांसह गुन्हा कबूल केला आहे; परंतु, मुद्देमाल मुख्य आरोपींच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी सांगितले.

Web Title: Parbhani; Two more accused in six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.