परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:21 PM2018-10-10T23:21:00+5:302018-10-10T23:21:51+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़

Parbhani: 21 villages do not spend any money on MNREGA | परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विविध १९ प्रकारच्या कामांचा समावेश केला आहे़ त्याचबरोबर ११ कलमी कार्यक्रमही हाती घेतला आहे़ दरवर्षी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत पुढील वर्षीच्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जाते़ वास्तविक पाहता केलेले नियोजन हे कागदावरच राहत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून या योजनेतून दिसून येत आहे़ मनरेगा योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तर आणि ५० टक्के कामे जि़प़ अंतर्गत ग्रामपंपचायतस्तरावर केली जातात़ मागील काही वर्षांत ग्रामपंचायतस्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरींची घेतली जात आहेत़ ग्रामपंचायतीकडूनही त्याच कामांची मागणी होत आहे़
यंत्रणास्तरावर शेत रस्ते, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, विहिर पुनर्भरण, शेततळी, तुती लागवड या कामांचा समावेश आहे़ यंत्रणास्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागामार्फत कामे केली जातात; परंतु, मनरेगा योजनेच्या कामात सर्वच विभागातील यंत्रणा उदासिन असल्याचे दिसून येत आहे़
त्यामुळे पाथरी तालुक्यातील २१ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू नाही़ त्यामुळे गावात मजुरांना रोजगारही उपलब्ध होत नाही़ तसेच या योजनेवर या २१ गावांमध्ये अद्याप छदामही खर्च झाला नाही़ त्यावरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे़
वृक्ष लागवड : केवळ कागदावरच
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला जातो़ जून महिन्यात या विभागाने २१ गावांमध्ये एकही काम हाती घेतले नाही़ त्यामुळे राज्य शाासनाचा महत्त्वकांक्षी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम कागदावरच राहिला असल्याचे दिसून येत आहे़ तसेच पाथरी तालुक्यातील केवळ बोरगव्हाण या एका गावातच मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी तुती लागवड कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे़
सध्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ सध्या शेतात कामे उपलब्ध नाहीत़ त्यामुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे़ अशा परिस्थितीत प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरू होणे आवश्यक आहे़
ही आहेत २१ गावे
आनंदनगर, बंदरवाडा, बाणेगाव, डाकू पिंप्री, पिंप्री, ढालेगाव, गोपेगाव, जवळा झुटा, वाडी, कानसूर, खेडुळा, लिंबा, लोणी, मंजरथ, मरडसगाव, निवळी, पाटोदा, फुलारवाडी, रामपुरी खु़, सारोळा बु़ व तुरा या गावांमध्ये अद्याप महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एकही काम सुरू झालेले नाही़
घरकुल कामासाठी मजूर
रमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी मनरेगा योजनेत १८ हजार रुपयांची मजुरी उपलब्ध करून दिली जाते़ सध्या तालुक्यात केवळ घरकूल बांधकामासाठीच ३३७ मजूर कामावर आहेत़ त्याशिवाय एकही काम सुरू नाही़ सिंचन विहिरींची कामेही अद्याप सुरू नाहीत़

Web Title: Parbhani: 21 villages do not spend any money on MNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.