लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

By मारोती जुंबडे | Published: December 29, 2023 04:58 PM2023-12-29T16:58:07+5:302023-12-29T16:58:39+5:30

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

In Parbhani, auto drivers offered flowers and rangoli to the potholes | लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

लोकप्रतिनिधी निवांत, प्रशासनाचे झोपेचे सोंग; ऑटोचालकांनी खड्ड्यांना वाहिले फुले अन् रांगोळी

परभणी: सर्वसामान्यांच्या करातून होणाऱ्या विकास कामांच्या दर्जाबाबत परभणीकरांना अद्यापही सजगता आली नसल्याने आजही धूळ आणि खड्ड्यातून नागरिक मार्ग काढत आहेत. शुक्रवारी शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत रेल्वे स्थानक ते बस स्थानक दरम्यान असलेल्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या. त्यामुळे हे अनोखे आंदोलन नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.

मागील काही दिवसापासून परभणी शहरातून जाणाऱ्या परभणी- वसमत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची लांबी- रुंदी एवढी वाढली आहे की, वाहने या खड्ड्यात अडकून पडत आहेत. मात्र याचे कोणतेही सोयर- सुतक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून येत आहे. त्याच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना वैद्यकीय प्रतिनिधींनी काही दिवसापुर्वी हार घालून अनोखे आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग येईल आणि हे खड्डे किमान बुजवतील, अशी अपेक्षा परभणीकरांना होती. परंतु गेंड्याची कातडी पांगरलेले प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील काही ऑटो चालकांनी एकत्र येत परभणी- वसमत रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून रांगोळी काढल्या.

या अनोख्या आंदोलनाने परभणीकरांमध्ये चर्चा सुरू होती, परंतु, हे खड्डे बुजवणार कधी? यासाठी पुढाकार घेणार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. दुसरीकडे सरकारच्या विरोधात असणाऱ्यांनी याबाबत आवाज उठवून किमान खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र शहरात असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे विरोधकांचे काम ऑटो चालकांनी केले असेच या आंदोलनावरून दिसून येत आहे.

जनसेवकांनी ओळखावी जबाबदारी
जनतेचे सेवक म्हणून ज्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोकशाहीने जबाबदारी दिली आहे, त्यातीलही काही मंडळी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी घबाड मिळविण्याकरीता सातत्याने धडपड करीत आहेत. अशा स्वार्थी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना जनतेने वठणीवर आणले पाहिजे, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे, शिवाय त्यांचे अस्तित्व हे या जनतेमुळेच आहे, याचीही त्यांना जाण करून दिली पाहिजे, तरच त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडेल, अन्यथा अजून काही वर्ष परभणी शहरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतूनच मार्ग करावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय प्रतिनिधी, ॲटो चालक यांच्यासह सर्वसामान्यांना आंदोलन करुन आपला राग व्यक्त करावा लागणार आहे. त्यासाठी जनसेवकांनी आपली जबाबदारी ओळखून किमान परभणीकरांच्या मूलभूत सुविधांसाठी तरी झगडावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: In Parbhani, auto drivers offered flowers and rangoli to the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.