नदीपात्रातील कच्चा रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांचा होडीतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:11 PM2018-09-11T12:11:34+5:302018-09-11T12:14:50+5:30

ग्रामस्थांना दररोज होडीच्या सहाय्याने दैनंदिन व्यवहारासाठी गंगाखेड शहर गाठावे लागत आहे़.

Due to the closure of the road in river basin, the villagers travel through the hitch | नदीपात्रातील कच्चा रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांचा होडीतून प्रवास

नदीपात्रातील कच्चा रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांचा होडीतून प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देयावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे़. ग्रामस्थ नदीपात्रातून होडीच्या सहाय्याने शहरात प्रवेश करावा लागत आहे़. 

- अन्वर लिंबेकर 

गंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीच्या पैलतिरावर असलेल्या चार ते पाच गावांतील ग्रामस्थांना नदीपात्रातील बंधाऱ्याचा कच्चा रस्ता वाहून गेल्याने दररोज होडीच्या सहाय्याने दैनंदिन व्यवहारासाठी गंगाखेड शहर गाठावे लागत आहे़. यामुळे तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे़. 
गोदावरी नदी काठावर धारखेड हे गाव असून, त्या पुढे मुळी, सुनेगाव, सायाळा, अंगलगाव, नागठाणा, धसाडी, माळसोन्ना, ठोळा ही गावे आहेत.

यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे़. त्यामुळे नदी पलीकडील धारखेड व इतर चार ते पाच गावांमधील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी गंगाखेड शहर गाठण्यासाठी कसरत करावी लागते़ त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना गंगाखेड येथे येण्याकरीता नदीपात्रात सिमेंटच्या पोत्यामध्ये वाळू भरून तात्पुरता बंधारा उभारण्यात आला होता़ या  बंधाऱ्यावरील रस्त्याचा वापर हे ग्रामस्थ करीत होते़. मात्र पावसाळ्यात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कच्चा बंधारा वाहून गेला आहे़. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थांना गंगाखेड शहरात येण्यासाठी परभणी-परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे पुलाचा वापर करीत होते़. या रेल्वे पुलावरून दुचाकी वाहने येत असल्याने पोलीस प्रशासनाने पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून पुलावरून दुचाकी चालकांकडून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे़ त्यामुळे पायी चालत जाऊन शहर गाठणे, अशक्य झाले़ परिणामी नदीपात्रातून होडीच्या सहाय्याने शहरात प्रवेश करावा लागत आहे़. 

नागठाणा येथील भोई समाजबांधवांनी गंगाखेड ते धारखेड अशी होडीची सेवा सुरू केली आहे़ प्रती माणसी ५ रुपये आणि दुचाकीसह प्रवासासाठी २० रुपयांचे भाडे घेतले जात आहे़ २० ते २५ किमी अंतराचा फेरा मारून शहरात येणाऱ्या ग्रामस्थांची पायपीट या सेवेमुळे कमी झाली आहे़ सध्या नदीपात्रात ८ होड्या चालविल्या जातात़ या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला आहे़. 

पर्यटनाचा आनंद
रस्त्याची समस्या निर्माण झाली असली तरी होडीच्या सहाय्याने जलप्रवास सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ पर्यटनाचा आनंद घेत आहेत़ तब्बल ३० वर्षानंतर नदीपात्रात होडी सुरू करण्यात आली आहे़ प्रवास भाडेही कमी असल्याने ग्रामस्थांसह बच्चे कंपनी होडीत बसून, आनंद घेत आहेत. 

पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांची गैरसोय
दामपुरीमार्गे परभणीला येण्यासाठी गंगाखेड नगर पालिकेने पोत्यात वाळू भरून तात्पुरता बंधारा उभारला होता़ यामुळे ग्रामस्थांचे सोयीचे झाले होते़ मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला हा पूल पावसाच्या पाणने वाहून गेला व पर्यायी केलेला कच्चा रस्ता देखील खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे़ 

पुलाचा प्रश्न मार्गी लावा
गंगाखेड-धारखेड दरम्यान गोदावरी नदीपात्रातून धारखेडमार्गे मुळी, सुनेगाव, नागठाणा, सायाळा, अंगलगाव, माळसोन्ना, ठोळा, धसाडी, दामपुरी, रावराजूर, रुमणा-जवळा, शिर्शी खु़ , रेणापूरमार्गे परभणीला जाण्याचे अंतर कमी होत असल्याने गोदावरी नदीपात्रात तत्काळ पूल उभारावा व ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. या पुलाची उभारणी झाल्यास वरील सर्व गावांतील ग्रामस्थांना परभणीपर्यंतचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय गंगाखेड शहराचा संपर्कही सोयीचा होणार आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पूल उभारणी संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे़

 

Web Title: Due to the closure of the road in river basin, the villagers travel through the hitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.