राष्ट्रीय आरोग्य समितीच्या दौ-यात कुमकुवत बाजू ठेवल्या झाकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:02 PM2017-11-07T13:02:47+5:302017-11-07T13:09:56+5:30

राष्ट्रीय आरोग्य समितीच्या अधिका-यांनी आरोग्य विभागातील स्थानिक अधिका-यांच्या मर्जीनुसारच पाहणी सुरु केली असल्याने सर्वकाही अलबेल, असल्याचे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.

Covered with a narrow side in the National Health Committee Tour | राष्ट्रीय आरोग्य समितीच्या दौ-यात कुमकुवत बाजू ठेवल्या झाकून

राष्ट्रीय आरोग्य समितीच्या दौ-यात कुमकुवत बाजू ठेवल्या झाकून

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व काही अलबेल असल्याचा दाखविण्याचा प्रयत्नअधिका-यांच्या मर्जीनुसारच पाहणी

परभणी :  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्णांसाठी जिल्ह्यात राबविण्यात येणा-या सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या राष्ट्रीय आरोग्य समितीच्या अधिका-यांनी आरोग्य विभागातील स्थानिक अधिका-यांच्या मर्जीनुसारच पाहणी सुरु केली असल्याने सर्वकाही अलबेल, असल्याचे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी औषधींचा तुटवडा, वैद्यकीय अधिकाºयांची उपस्थिती, मिळणारी सेवा याबाबींकडे दुर्लक्ष होत आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील दोन जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेतला जातो. यावर्षी ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य समिती जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेत आहे. रविवारी या समितीने जिल्हा कचेरीत आढावा बैठक, सामान्य रुग्णालयास भेट दिली.  त्यानंतर रात्री उशिरा रुग्णालयातील टेलिमेडिसीन कक्ष, पाकगृह, स्त्री रुग्णालय, अस्थीव्यंग विभाग, महात्मा फुले जन आरोग्य विभाग, शीतसाखळी कक्ष, अपघात विभाग आदी विभागातील विभागप्रमुखांकडून माहिती घेतली. विशेष म्हणजे दिलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याऐवजी उपलब्ध माहितीवरच पथकाने समाधान मानले. त्यानंतर सोमवारी या समितीची तीन पथके तयार करण्यात आली. एका पथकाने गंगाखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालय, महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. 

दुस-या पथकाने खादगाव, हरंगुळ येथील आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. तर तिस-या पथकाने पालम शहरातील ग्रामीण रुग्णालय व राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. भेटी दरम्यान रुग्णालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीवरच या समितीने समाधान मानल्याचे  दिसून आले. त्यामुळे या समितीची पाहणी रुग्णालयाच्या स्थानिक अधिका-यांच्या माहितीपुरतीच मर्यादित आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, १५ दिवसांंपासून राष्ट्रीय आरोग्य समितीचे पथक दौ-यावर येणार असल्याची माहिती असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाºयांनी स्वच्छ व रंगरंगोटी केलेल्या रुग्णालयाची पाहणी करुन पथक निघून गेले. स्थानिक अधिका-यांनी ठरवून दिलेल्या कार्यक्रमांनुसारच पथकाने दुस-या दिवशी पाहणी केली. स्वत:हून मार्ग बदलून अनपेक्षित आरोग्य केंद्रांना पथकाने भेट दिल्यास खरी परिस्थिती पहावयास मिळू शकते; परंतु, स्वतंत्र निर्णय घेऊन पाहणी करण्याची तसदी सोमवारी पथकाकडून घेण्यात आली नसल्याचेच पहावयास मिळाले. 

रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडले गा-हाणे 
गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पथक दाखल झाले. या पथकात  डॉ.एस.सी.अग्रवाल, डॉ. ज्योती, डॉ.पद्मावती, डॉ.सुशांत अग्रवाल, डॉ.अपर्णा कुल्लू, डॉ.प्रशांत कुमार, डॉ.निताशा कौर, डॉ.विवेक सिंघल, सत्यजीत शाहू, डॉ.अजय प्रकाश, रविंद्र शेळके, डॉ.शरद पाटील, डॉ. रघुनाथ राठोड, डॉ.उमेश शिरोडकर, डॉ.जमादार, डॉ.गौरव जोशी, डॉ.अमोल मानकर, डॉ.बाळासाहेब सुकाणे आदींची उपस्थिती होती. १४ गाड्यांचा ताफा घेऊन हे पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.  यावेळी पथकातील सर्व सदस्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली व रुग्णालय परिसरात असलेल्या नातेवाईकांना प्रश्न केले. तेव्हा उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात रुग्णवाहिका नाही, एक्स- रे मशीन बंद आहे, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा रुग्णालयात अभाव आहे. सोनोग्राफी कक्ष नाही आदी समस्या पथकासमोर मांडल्या.  त्याच प्रमाणे महामार्गावरील हे उपजिल्हा रुग्णालय असल्याने येथे येणा-या रुग्णांची संख्या तसेच परिसरातील घडणाºया अपघाताच्या घटना लक्षात घेऊन रुग्णालयात ट्रामा केअर युनीट द्यावे व रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी केली. 

पालममध्ये समितीच्या पाहणीत औषधींचा तुटवडा
पालम येथील ग्रामीण रुग्णालयास पथकाने दुपारी २ वाजता भेट दिली. या पथकात डॉ.नताशा कौर, डॉ.अर्पणा कुल्लू, डॉ. रघुनाथ राठोड आदींचा समावेश होता. पथकाने रुग्णालयातील प्रशासकीय माहिती घेतली. तसेच रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रत्येक विभागात जावून कागदपत्रांची तपासणी करुन संबंधित कर्मचारी वर्गांकडून माहिती घेण्यात आली. औषधी भांडाराची पाहणी करताना पथकाच्या सदस्यांना औषधींचा तुटवडा जाणवला. याबाबत स्थानिक अधिका-यांना विचारणा केली असता त्यांनी बरीच औषधी राज्यस्तरावरुन पुरवठा होत नसल्याचे सांगितले.
यावर पथकाने रुग्णांना तपासणीनंतर कसा औषधी पुरवठा केला जातो, यावर चर्चा करीत बाहेरुन औषधी खरेदी करायला लावतात का? असा सवाल केला. यावर डॉक्टरांनी औषधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. एका-एका विभागाची पथकाने झाडाझडती घेतल्यानंतर पथक दुपारी ४ वाजेच्या सुमारास परत गेले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कालिदास निरस, डॉ.वैद्यकीय अधीक्षक डॉ.सिद्धार्थ भालेराव यांची उपस्थिती होती. दरम्यान, पथक येण्याची कुणकुण लागल्याने कर्मचारी वर्ग पोशाखात हजर होता. तसेच रुग्णालय परिसराची साफसफाई करण्यात आली होती. 

यावेळी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत समिती प्रमुखांनी गंगाखेड परिसरातील रस्त्यांच्या दूरवस्थेचा प्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित केला. तसेच पत्रकारांनी रुग्णालयातील सुविधाबाबत देण्यात येणाºया समस्या मांडल्या. तेव्हा सर्व सुविधा घरातच पाहिेजेत का? असा उलट प्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित करुन छायाचित्रकाराला फोटो काढण्यास मज्जाव केला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभागाची पाहणी करीत अर्धा तास बंद खोलीत अधिका-यांसोबत चर्चा केली. त्यानंतर १२.३० वाजेच्या सुमारास हे पथक भोजनासाठी रवाना झाले. भोजनानंतर एका पथकाने महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.  दुस-या पथकाने हरंगुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खादगाव येथील उपकेंद्राला भेट दिली. तर तिस-या पथकाने राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली. त्यानंतर हे पथक पालमकडे निघून गेले. 

Web Title: Covered with a narrow side in the National Health Committee Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.