परभणीत 76 शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 03:43 PM2018-06-01T15:43:43+5:302018-06-01T15:43:43+5:30

कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.

76 farmers was arrested while attempting suicide at Parabhani | परभणीत 76 शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

परभणीत 76 शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देपरभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकऱ्यांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित करण्यात आल्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी

परभणी :  निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकऱ्यांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी मागील एक वर्षापासून हे शेतकरी शासन दरबारी निवेदने, आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. मात्र त्यांच्या मागणीवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकऱ्यांनी १ जून रोजी आत्मदहनाचा इाशारा दिला होता. 

या शेतकऱ्यांच्या इशाऱ्या प्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. या दोन गावातील जमीन संपादित झालेले गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकऱ्यांनी इशारा दिल्या प्रमाणे शुक्रवारी १२ वाजेच्या सुमारास हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. तेव्हा जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेटवर या शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांकडून अडविण्यात आले. त्यांच्या जवळ असलेले साहित्य जप्त करुन त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 

सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त 
संबर व पिंपळगाव टोंग येथील ७६ शेतकऱ्यांनी वाढीव मावेजा मिळावा, यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरातील जायकवाडी वसाहत व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे हे शेतकरी कार्यालयापर्यंत पोहचू शकले नाहीत.

Web Title: 76 farmers was arrested while attempting suicide at Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.