तलाव जिवंत होतो तेव्हा! - गोंदिया जिल्ह्यातला एक ‘तरुण’ प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 07:00 PM2018-11-29T19:00:00+5:302018-11-29T19:00:02+5:30

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मनीष राजनकर, पतिराम तुमसरे आणि शालूबाई यांनी तरुण मुलामुलींना सोबत घेऊन आपल्या गावातल्या मृत तलावांना पुन्हा ‘जिवंत’ करण्याचं काम सुरू केलंय. या एका खास प्रयोगाविषयी.

When the lake is alive! - A 'youth' experiment in Gondia district | तलाव जिवंत होतो तेव्हा! - गोंदिया जिल्ह्यातला एक ‘तरुण’ प्रयोग

तलाव जिवंत होतो तेव्हा! - गोंदिया जिल्ह्यातला एक ‘तरुण’ प्रयोग

Next
ठळक मुद्देआपल्याला आपल्या महाराष्ट्राचीच पुरेशी ओळख नसते. ती ओळख करत निघालं तर गोंदियात हा प्रयोग भेटला तसे अनेक प्रयोग भेटतील!

-प्राची पाठक

एका समुद्रकिनार्‍यावर लाखो मासे जोरात वाहून येतात. पुन्हा पाण्यात जाण्यासाठी धडपडतात. काही पाण्याबाहेर फेकले जातात. एक तरुण मात्र एकेक मासा उचलून दूर समुद्रात फेकत असतो. आजूबाजूचे लोक त्याला हसतात. विचारतात,
‘असे किती मासे तू एकटा उचलून फेकणार, ते किती जगणार?’
- तो म्हणतो, किती ते माहिती नाही, निदान माझ्या हातात असलेला एक तरी मी जगवू शकलो, याचा आनंद आहे.
या गोष्टीत असतात आणि बदलाची वाट चालतात, असे तरुण प्रत्यक्षात असतात का? - असतात!
त्यातलेच काही गोंदिया जिल्ह्यांत भेटतात.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मनीष राजनकर आणि त्यांच्यासोबत काम करणारे पतिराम, शालू आणि अनेक तरुण मुलंमुली, घरोघरच्या साध्या आयाबाया हे सारे सध्या असंच एक भन्नाट काम करत आहेत. त्यांनी आपल्या परिसरात तलाव संवर्धनाचं काम हाती घेतलं. तेही लोकसहभागातून. तरुण मुलांना आणि घरातल्या तरुण स्त्रियांच्या मदतीनं!
विदर्भात खासकरून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर इथं अनेक छोटे-मोठे तलाव पूर्वापार आहेत. यातील बहुतेक तलाव गोंड राजांच्या कालखंडात बांधले गेलेले आहेत. साधारण दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीचे हे तलाव. या तलावांना ‘मालगुजारी तलाव’ म्हणतात.  त्या काळी गोंड राजे जंगल कापून गाव वसवणार्‍याला आणि तलाव बांधणार्‍यांना वेगवेगळ्या पदव्या आणि जमिनी बक्षीस म्हणून देत असत. या तलावांची देखरेख, तलावांमध्ये पाणी वाहून येतं त्या पाटांची देखरेख, तलावात साचलेला गाळ उपसणं अशी सगळी कामं तलाव बांधणार्‍या लोकांच्या देखरेखीखाली आजूबाजूचे शेतकरी करत असत. हळूहळू या तलावांच्या आजूबाजूनं आणि तलावांमध्ये जैववैविध्य वाढू लागलं. पाण्यातलं सजीव वैविध्य वेगळं, तर पाणी अडवणारं, मातीत जिरवणारं, जमिनीची धूप थांबवणारं जैववैविध्य वेगळं. वेगवेगळ्या प्रकारच्या पाणवनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे मासे, जलचर यांचं एक नातं या तलावांमध्ये दिसू लागलं. एक निसर्गचक्र आकाराला आलं. त्यासोबतच तलाव कसे बांधायचे याचं पारंपरिक ज्ञान काही जनसमूहांकडे पूर्वापार होतं त्यांना या निसर्गचक्रात रस निर्माण झाला.  पाण्यातील माशांचं विश्व फुलवायचं, टिकवायचं कसं हे माहीत असणारे काही जनसमूह होते. त्यात ‘ढिवर’ हा एक समाज. परंपरागत मासेमारी करणारा. मात्र आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा मागास.
ब्रिटिश भारतातून गेल्यावर हे मालगुजारी तलाव सरकारजमा झाले. मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या तलावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे सोडण्यात आले. काही माशांनी तलावातील स्थानिक माशांना नष्ट करायचा सपाटा लावला. सुरुवातीला या नव्यानं टाकलेल्या माशांनी भरपूर फायदा करून दिला. लोकांच्या हातात पैसा आला. पण तलावांचं पर्यावरण बिघडत गेलं. स्थानिक मासे या सरकारी माशांनी गिळंकृत केले. जलचरांना अनुकूल असलेल्या पाणवनस्पतीदेखील हळूहळू नष्ट होऊ लागल्या. सुरुवातीला भरपूर पैसा मिळवून देणारे मासे काही काळानं त्याच तलावात पुरेसे वाढत नाहीत, हे लक्षात आलं. त्यांच्यापासून मिळणारं उत्पन्न कमी होऊ लागलं. तलावांमध्ये एकीकडे पाणी उपसा जोरात होणार,  दुसरीकडे पाणी प्रदूषित होण्याचं प्रमाण वाढणार, गाळ उपसायच्या नावाखाली मोठाले मशीन तलावांमध्ये येऊन तिथे मोठाले खड्डे करणार. मुरमाचं आवरणसुद्धा खरवडून टाकणार. आधी तलावांमध्ये टिकून राहणारे पाणी या मशीनच्या खोदकामामुळे एकतर मातीत जिरून जाणार, नाहीतर इतरत्र वाहून जाणार. त्यातूनच ‘बेशरम’ नावाच्या वनस्पती तलावभर वाढत सुटल्या. आणि सगळं तंत्रच बिघडलं. एकेक करत भंडारा आणि गोंदियातले तलाव नष्ट होत होते.
हे सारं मनीष राजनकर पाहत होते. मग त्यांनी ठरवलं परंपरागत ज्ञान आणि प्रत्यक्ष काम यांची सांगड घालून स्थानिक लोकांच्या विशेषतर्‍ तरुणांच्या मदतीनं तलाव संवर्धनाचं काम सुरू करायचं. मात्र त्याआधी बराच काळ त्यांनी एकेका तलावाचं पर्यावरण समजून घेतलं, निरीक्षणं टिपली, शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड देत तलाव समजून घेतले. त्यातूनच त्यांना एकेका माशाचं वैशिष्टय़ कळत गेलं. तलावांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाचं आणि जंगलाचं नातं कळलं. परंपरागत ज्ञान या तलावांच्या संवर्धनासाठी किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी हेरलं. पारंपरिक ज्ञानावर उत्तम पकड असलेल्या पतिराम तुमसरे यांच्याशी ओळख झाली. ढिवर या परंपरागत मासेमारी करणार्‍या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. मनीष वेगवेगळ्या तलावांच्या अभ्यासासाठी, निरीक्षण-नोंदींसाठी पतिराम यांच्या सोबत जाऊ लागले. पतिराम भाऊंच्या पारंपरिक ज्ञानानं ते थक्क झाले होते. 
2008 साली त्यांनी ‘भंडारा निसर्ग आणि संस्कृती अभ्यास मंडळ’ या संस्थेमार्फत थेट गोंदियामधील अर्जुनी मोरगाव या ठिकाणी काम सुरू केलं. या तालुक्यात सर्वाधिक मालगुजारी तलाव आहेत, असं त्यांच्या लक्षात आलं होतं. सुरुवातीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी गावातल्या ‘नव तलाव’ या तलावाची निवड केली. जलचरांना अनुकूल वनस्पती कोणत्या, विशिष्ट माशांना वाढीसाठी आवश्यक असणार्‍या वनस्पती कोणत्या आणि त्यांची त्या तलावातली काय स्थिती आहे, याच्या नोंदी ठेवून प्रयोग सुरू झाले. समजून उमजून स्थानिक माशांच्या प्रजातींना प्रोत्साहन देणं, नष्ट झालेल्या जल वनस्पतींची पुनर्लागवड करणं असे विविध प्रयत्न लोकसहभागातून सुरू झाले. 
ढिवर समाजाच्या स्त्रियांचा सहभाग या कामी कसा वाढेल, या दृष्टीने कामाची आखणी होऊ लागली. भंडारा आणि गोंदिया येथील सुमारे बारा मासेमार सहकारी संस्थांसोबत कामाचा पसारा वाढू लागला. महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, आयसर यांच्या समन्वयाने महाराष्ट्र जनुक कोष उपक्रमाच्या माध्यमातून तलावांचं पुनरुज्जीवन लोकसहभागातून सुरू झालं. पारंपरिक ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर तलावांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी होऊ लागला. तलावांवर रोजगारासाठी अवलंबून असणार्‍या जनसमूहांची उन्नतीदेखील यातूनच साधणार होती. तलावांमध्ये स्थानिक मासे वाढू लागले. तिथलं जैववैविध्य खुलू लागलं. महत्त्वाच्या पाणवनस्पती नव्यानं रुजल्या. वेगवेगळे पक्षी परत तलावांकडे वळले. त्यांना अधिवास मिळू लागला. 
आज बारा गावांमध्ये हे प्रयत्न सुरू आहेत. पतिराम तुमसरे, शालू कोल्हे यांच्या साथीनं तलाव संवर्धनाच्या कामानं चांगलाच वेग पकडला आहे. आज जे काम ही माणसं करताहेत त्यातून पुढील किमान तिनेकशे वर्षांसाठी या तलावांचं स्वास्थ्य अबाधित राहील, अशी आशा आहे.
***
 

महाराष्ट्रात भटकताना.

फार जग पाहिलंय त्यानं, फार प्रवास केलाय असं अनेकजण कौतुकानं सांगतात. पण हे जग कोणतं, विदेश-पुणं-मुंबई ही मोठी शहरं की देशातली गाजलेली टुरिस्ट डेस्टिनेशन्स? त्यापलीकडे करतो का आपण प्रवास? 
या सुटीत चला बुलडाण्याला फिरायला जाऊ, असं कितीजण म्हणतात? 
धुळे-नंदुरबार आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे काय मस्तं ट्रॅव्हल स्पॉट्स आहेत, तिथं जाऊ असं किती जण ठरवतात? का नाही जात आपण इकडे भटकायला?
कारण आपल्याला आपल्या महाराष्ट्राचीच पुरेशी ओळख नसते. ती ओळख करत निघालं तर गोंदियात हा प्रयोग भेटला तसे अनेक प्रयोग भेटतील!

तलाव-विहिरीत निर्माल्य?


शाळेत असताना आपण मारुती चितमपल्ली यांचे धडे वाचलेले असतात. त्यातलं निसर्गवर्णन आपल्याला चकीत करून गेलेलं असतं. निसर्गातलं जलचक्र  आणि ती एक अन्नसाखळी तर बालवाडीपासून सुरू होते ती थेट ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्याला साथ देते. तलावांची इको सिस्टीम वगैरे सगळं पाठ झालेलं असतं. तलावांमध्ये कोणत्या पाणवनस्पती वाढल्या की सूर्यप्रकाश थेट आतर्पयत जात नाही तलावात, हेही पाठ होऊन गेलेलं असतं. पण तेच आपण घरातल्या एखाद्या पूजेचं निर्माल्य सहज एखाद्या तलावात भिरकावून देतो.  प्लॅस्टिकचे पेले, डिश, वाटय़ा, चमचे, थर्मोकॉलचं आणखीन काय काय असं सगळंच तलावांत-विहिरीत टाकतो. आपल्या अवतीभोवतीचे तलाव आणि जलस्नेत आपणच संपवतोय, याचं भान ठेवलं तरी पुरे!


( लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार आहेत.)
 

Web Title: When the lake is alive! - A 'youth' experiment in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.